राज्य सरकारकडून कर्जमाफीची रंंगीत तालीम

jalgaon-digital
2 Min Read

300 सोसायट्याच्या खात्यावर प्रत्येकी एक रुपया वर्ग: सोसायट्याच देणार कर्जमुक्तीचे दाखले

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या कर्जमाफीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा बँकेच्या ऑडीट पूर्ण केलेल्या नावाची यादी सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. जिल्हा बँकेच्या सर्वच कर्जदार सभासद शेतकर्‍यांची खाती बँकेत नाहीत. त्यांची खाते त्यात्या गावातील सोसायटीत असल्याने कर्जमाफीची रक्कम आधी सोसायटीच्या खात्यावर जाणार आहे. यामुळे सरकारने कर्जमाफी प्रक्रियेच्या रंगित तालीम दरम्यान, जिल्ह्यातील 300 सोसायट्यांच्या खात्यावर प्रत्येक एक रुपया जमा केला.

ही प्रक्रिया बिनचूक झाल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात आली. यात सर्वप्रथम जिल्हा बँकेच्या 3 लाख शेतकर्‍यांची यादीचे सरकारी लेखा परीक्षकांकडून ऑडीट करण्यात आले. त्यानंतर ऑडीट पूर्ण केलेल्या शेतकर्‍यांची यादी सरकारच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. अपलोड केलेल्या यादीतील शेतकर्‍यांच्या प्रायोगिक तत्त्वावर आधार प्रामाणिकरण करण्यात आले.

या प्रामणिकरणासोबतच बँकेत खाते असणार्‍या सोसायट्यांची माहिती, त्यांचा खातेनंबर बरोबर आहे की नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्यक्षात कर्जमाफी प्रक्रियेची रंगित तालीम करण्यासाठी बँकेच्या 300 सोसायट्यांच्या खात्यावर प्रत्येकी एक रुपयांप्रमाणे निधी वर्ग करण्यात आला. वर्ग करण्यात आलेला निधी बरोबर सोसायटीच्या खात्यात वर्ग झाल्याने आता प्रत्यक्षात लवकरच कर्जमाफीची प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या प्रत्येक सभासदाचे खाते बँकेत नसले तरी त्या त्या गावांतील सोसायटीमध्ये आहे. यामुळे सरकार आधी कर्जमाफीची रक्कम बँकेत खाते असणार्‍या सोसायट्याच्या खात्यावर वर्ग करणार आहेत. त्यानंतर सोसायटी पातळीवरून संबंधीत कर्ज पात्र कर्जदार खात्यात वर्ग करून त्याला कर्जमुक्तीचा दाखला सोसायटी पातळीवर देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
………….
संगमनेर तालुक्यातील राजापूर गावातील भाऊसाहेब रामभाऊ खतोडे, पुजांहरी कोंडी हासे, संजय लक्ष्मण हासे, बबन भिकाजी सोनवणे, मनोज रामभाऊ हासे, किसन मारूती हासे या शेतकर्‍यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले.
……………

Share This Article