Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खडसेंकडून खालच्या दर्जाचे राजकारण

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खडसेंकडून खालच्या दर्जाचे राजकारण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातील पुरावे शोधण्यासाठी आपले मित्र कोचर यांच्या घरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व पारस ललवाणी यांनी पुणे एलसीबीच्या मदतीने खोट्या सर्च वॉरंटचा उपयोग केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचेच नेते प्रफुल्ल लोढा यांनी केला आहे.

- Advertisement -

तसेच खडसेंंंनी खूप प्रयत्न करून देखील आपण हे पुरावे त्यांना वा इतरांना सोपविले नाही. तथापि, खडसेंनी आपल्याकडून तीन फोटो घेतले असले तरी इतर पुरावे फक्त आपल्याकडेच असल्याचा दावाही यावेळी लोढा यांनी केला.

आज जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोढा यांनी गिरीश महाजनांना सोडून खडसे, ललवाणी व रामेश्वर नाईक यांना लक्ष्य केले.

कागदपत्रांसह इतर जप्त करुन नेले

या पत्रकार परिषदेत लोढा म्हणाले की, रामेश्वर नाईक हे आसाराम बापू यांचे भक्त असून एकनाथराव खडसे व पारस ललवाणी हे खालच्या दर्जाचे राजकारण करणारे लोक आहेत.

आपल्याकडे गिरीश महाजन यांच्या विरूध्दचे पुरावे असल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांनी गैरमार्गाचा वापर केला.

बीएचआर प्रकरणात आपल्यासह आपले मित्र कोचर यांच्या घराचे सर्च वॉरंट काढण्यात आले. यानंतर पुणे एलसीबीच्या मदतीने त्यांनी आम्हा दोघांच्या घरांची झडती घेऊन काही डॉक्युमेंट व अन्य बाबी जप्त करून नेल्या असल्या तरी याबाबत त्यांनी कागदोपत्री काहीही माहिती दिलेली नाही.

यामुळे यात काही महत्वाचे डॉक्युमेंट हे खडसे आणि ललवाणी यांच्याकडे गेले असल्याची शक्यता लोढा यांनी व्यक्त केली.

कथित सीडीच्या गोष्टीला दिली बगल

या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल लोढा यांनी एकनाथराव खडसे व पारस ललवाणी यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतले. हे दोन्ही नेते वैयक्तीक व राजकीय पातळीवर खराब असल्याचे दावे त्यांनी केले. तथापि, सीडी वा अन्य बाबींबद्द त्यांनी सोयिस्कर मौन बाळगले.

आधी भाजपमध्ये तर नंतर राष्ट्रवादीत आलेले प्रफुल्ल लोढा यांनी गत काही महिन्यांपासून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत संशयकल्लोळ निर्माण करणारे वक्तव्य अनेकदा केले.

विशेष करून महाजन व त्यांचे आरोग्य सेवक रामेश्वर नाईक यांच्याबाबतच्या काही व्हिडीओ क्लीप्स आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी आधी केला होता.

तसेच यामुळे महाजन, नाईक आणि त्यांच्या समर्थकांकडून आपला घातपात होण्याचा धोका असल्याची तक्रार देखील त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या पार्श्वभूमिवर, आज प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषद घेतली.

यात ते कथित सीडीबाबत काही तरी गौप्यस्फोट करतील अशी अपेक्षा होती. तथापि, त्यांनी याला बगल देत अनपेक्षितरित्या एकनाथराव खडसे व पारस ललवाणी यांच्यावर हल्लाबोल केला. याच्या सोबतीला त्यांनी रामेश्वर नाईक यांना देखील टार्गेट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या