Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकभाव गडगडल्याने कोथिंबीरीचा बियाण्यांसाठी वापर

भाव गडगडल्याने कोथिंबीरीचा बियाण्यांसाठी वापर

शिरवाडे वणी। वार्ताहर Shirvade Vani

शिरवाडे परिसरात थंडीच्या दिवसातही कोथंबीरीचे उत्कृष्ट पीक आले असून भाव नसल्यामुळे मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कोथंबीर पिकाचा बियाणे तयार करण्यासाठी वापर करू लागले आहेत.

- Advertisement -

जुन, जुलै महिन्यात करोना रोगाच्या वाढत्या प्रसारामुळे शेतकरीवर्गाने शेतीमालाला भाव मिळतो की नाही, या संभ्रमाने फळभाज्यांची व पालेभाज्यांची लागवड अत्यल्प प्रमाणातच केली होती. परंतु, पावसाचे पिकांसाठी आवश्यक तेवढेच प्रमाण राहिल्यामुळे पिकांना आणखी पोषक वातावरण निर्मिती झाल्यामुळे व पिकांच्या कमी प्रमाणात लागवडी झाल्यामुळे सरासरी प्रत्येक फळभाज्या व पालेभाज्या दिवाळीचा सण येईपर्यंत भाव खात होत्या. त्यामुळे खाणार्‍यांच्या खिशाला झळ बसली.

परंतु शेतकरी वर्गाच्या खिशात काही प्रमाणात पैसे खुळखुळले. मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिके मातीमोल भावाने विकल्यामुळे पुढील पिके उभी करण्यासाठी शेतीला भांडवल म्हणून शेतकर्‍यांनी फळभाज्या व पालेभाज्यांचे पीक घेतले. त्यास चांगला बाजारभाव मिळाला. साहजिकच शेतकर्‍यांनी कोथंबीर, मेथी, शेपू आदी पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यातच यावर्षी थंडीचे दोन महिने संपत आल्याने या पालेभाज्यांच्या वाढीला पोषक वातावरण मिळून कोथिंबीरीचे पीक जोमात आले. कोथिंबिरचे पीक हे अवघे सव्वा महिन्याचे असल्याचे त्यास प्रारंभी 10 हजार रु. भाव मिळाला. हा बाजारभाव बघता शेतकर्‍यांनी कोथिंबीर पीक लागवडीला पसंती दिली.

मात्र ऑक्टोबर महिन्यात वाढलेले भाव नोव्हेंबर मध्ये गडगडले. सध्या कोथंबीर 100 ते 200 रु. शेकडा भावाने विकू लागली असून 2 हजार जुड्यांचे अवघे 2 ते 4 हजार रु. येवू लागले आहे. कोथंबीर पिकाचा खर्च बघता 20 गुंठ्यासाठी 120 रु. भावाचे 20 किलो बियाणे 2400 रु., निंदणीचा खर्च 2 हजार रु., काढणीचा खर्च 4 हजार रु., औषधांचा खर्च 1 हजार रु., गाडी भाडे 4 हजार रु. असा एकुण 13,400 रु. असा खर्च येतो. परंतू आजचा बाजारभाव बघता 2 ते 4 हजार रु. खिशात येत असल्याने निव्वळ तोटा 8 ते 9 हजार रु. होऊ लागला आहे. त्यामुळे कोथिंबीर विकण्यापेक्षा त्याचे चांगल्या प्रतीचे बियाणे तयार झाल्यास या बियाणाच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतील किंवा पुढील हंगामात पेरणीसाठी हे बीयाणे उपयोगात येईल.

साधारणपणे 20 गुंठ्यात 700 किलो बियाणे तयार होऊन 70 ते 80 हजार रुपयापर्यंत पैसे तयार करण्याचा शेतकर्‍यांचा मानस आहे. त्यामुळे फुले आलेली कोथिंबीर आता बियाणे तयार करण्यासाठी वापर करतांना शेतकरी दिसत आहेत. कोथिंबीर प्रमाणेच मेथी, पालक, कांदा पात यांचेही भाव गडगडले असून या सार्‍या साठमारीत बटाटे पिकाने मात्र चांगलीच उचल खाल्ली असून बटाट्याचे बाजारभाव तेजीत असले तरी तालुक्यात बटाट्याचे उत्पादन होत नसल्याने शेतकर्‍यांना त्याचा फायदा नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या