Monday, April 29, 2024
Homeनगरबनावट एसएमएसला प्रतिसाद देऊ नका

बनावट एसएमएसला प्रतिसाद देऊ नका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील महिन्यांचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यासाठी ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही एसएमएस व व्हॉट्सअ‍ॅप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये,असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येणार्‍या परंतु महावितरणशी संबंधित एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी एमएसईडीसीएल असा आहे.

तसेच या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिकार्‍यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही. महावितरणकडून केवळ एसएमएसद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या