Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदहा हजारासाठी 'ते' बनले कोरोना रुग्ण!

दहा हजारासाठी ‘ते’ बनले कोरोना रुग्ण!

औरंगाबाद – aurangabad

कोरोना (corona) रुग्णांच्या जागी (Fake patient) बनावट रुग्ण मेल्ट्रॉन कोव्हीड सेंटर (Meltron Coveid Center) भरती केल्याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी तिसरा आरोपी गौरव गोविंद काथार (१९, रा. म्हाडा कॉलनी) याला ताब्यात घेतले. त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, गौरव काथार याला ताब्यात घेतल्यानंतर आपण सिद्धार्थ उद्यानात गेलोच नव्हता, असा नवीन खुलासा केल्याने, बनावट रुग्ण प्रकरणातील गुंता वाढलेला आहे.

- Advertisement -

सिद्धार्थ गार्डन येथे दोन तरुणांना कोरोना असल्याचे समोर आले होती. या प्रकरणी गगन भीमराव पगारे आणि गौरव गोविंद काथार या दोघांना मेल्ट्रॉनमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, दोन जणांच्या मध्यस्थीने त्यांच्या जागेवर अक्षय आणि अमोल या दोघांना उपचारासाठी पाठविले. या दोघांनी दोन दिवस उपचार घेतला. त्यानंतर त्यांनी कोव्हिड सेंटरमधून बाहेर जाण्यासाठी तगादा लावला. अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर, दहा हजार रुपयांमध्ये गगन आणि गौरवच्या जागेवर मेल्ट्रॉनमध्ये राहण्यासाठी आल्याचा खुलासा केला. या प्रकरणानंतर अक्षय आणि अमोल या दोघांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर या दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली.

या प्रकरणात अक्षय, अमोल यांच्यासह गगन पगारे आणि गौरव काथार यांच्यासह साबळे आणि विजय मापारी या दोन मध्यस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एमआयडीसी सिडको पोलिस या आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, एमआयडीसी सिडको पोलिसांनी गौरव काथार याच्याबद्दल वेदांतनगर पोलिसांना माहिती दिली. वेदांतनगर पोलिसांनी गौरव काथार याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक सुधाकर पाटील, पोलिस अंमलदार शिवराज बिरारे, बाळासाहेब ओवांडकर यांनी केली.

दरम्यान, गौरव काथार हा स्वत: मेल्ट्रॉन कोव्हिड सेंटरवर गेला होता. तेथे त्यांनी आपली बाजू सांगितली. सिद्धार्थ उद्यानात चाचणी करणारा लॅब टेक्नीशियन शिंगारे यानेही त्याला ओळखले नाही. त्याची पुन्हा अँटिजेन चाचणी घेण्यात आली. त्याच्यात तो निगेटिव्ह आढळला. आरटीपीसीआरचा अहवाल उशिरा येणार आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

या प्रकरणात गौरव याने दिलेल्या खुलाशावरून गगन पगारे हा चौथा आरोपीही पॉझिटिव्ह आहे किंवा नाही? अशी शंका निर्माण होत आहे. या प्रकरणात सिद्धार्थ उद्यानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून ही तपासणी झाली होती किंवा नाही? तपासणी झाली, तर खरे पॉझिटिव्ह रूग्ण कोणते होते? या रुग्णांनी दहा हजार रुपयांमध्ये दोन जणांना बोगस रूग्ण म्हणून का पाठविले? यात विजय मापारी तसेच साबळे यांची काय भूमिका आहे? याची तपासणी पोलिसांना करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या