बनावट लग्न लावून देणारी टोळी कर्जत पोलिसांनी पकडली

jalgaon-digital
2 Min Read

कर्जत |वार्ताहर| Karjat

लग्न न होणार्‍या युवकांना बनावट नवरी उभा करून त्यांचे लग्न लावून द्यावयाचे आणि नंतर अंगावरील दागिने रोकड घेऊन पळून जायचे.

नंतर काही दिवसांनी मुलाकडील नातेवाईकांना लक्षात येते की आपली फसवणूक झाली आहे. अशाच पद्धतीचे प्रकार कर्जत तालुक्यातील एका गावांमध्ये घडला असता कर्जत येथील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बनावट लग्न करणारी टोळी गुरुवारी (दि. 25) जेरबंद केली आहे.

अटक करण्यात आलेले राजू वैजनाथ हिवाळे (रा. सिंहगड रोड, पुणे) व बनावट नवरी पल्लवी गोमाजी सगट (रा. सोनपेठ परभणी) अशी आहेत. यापूर्वी अशाच पद्धतीने तीन ते चार लग्नाच्या माध्यमातून फसविल्याचे उघड झाले आहे. कर्जत तालुक्यातील एका तरुण मुलास राजू हिवाळे, विलास जोजर (रा. हिंगोली) मंगलबाई दत्तात्रय वाघ (रा. पोखरने सोनपेठ, परभणी) व पल्लवी गोमाजी सगट (रा. सोनपेठ परभणी) यांनी ‘तुझे लग्न दोन दिवसांमध्ये एका मुलीशी करून देतो, असे म्हणून आळंदी पुणे या ठिकाणी नवर्‍या मुलाकडून दोन लाख 10 हजार रुपये रोख घेऊन लग्न लावून दिले.

मात्र लग्नानंतर विवाहिता दुसर्‍या दिवशी निघून गेली ती पुन्हा आलीच नाही. यानंतर त्या कुटुंबियांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परभणी येथे जाऊन दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 60 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

अटक करणार्‍या पथकात सहा. पो. निरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस मारुती काळे, तुळशीदास सातपुते, सागर मेहेत्रे, भाऊ काळे, गणेश भागडे, संपत शिंदे यांचा समावेश होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *