Friday, April 26, 2024
Homeनगर‘त्या’ बनावट दागिन्यांवर प्रतिष्ठित सराफ दुकानाच्या नावाचा शिक्का

‘त्या’ बनावट दागिन्यांवर प्रतिष्ठित सराफ दुकानाच्या नावाचा शिक्का

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या केडगाव शाखेतील बनावट सोने तारण कर्जप्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत सर्व बनावट सोने जप्त करण्यात आले आहेत. आता पोलिसांकडून त्या बनावट सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली जात आहे.

- Advertisement -

या बनावट दागिन्यांवर नगर शहरातील एका प्रतिष्ठित व मोठ्या सराफ दुकानाच्या नावाचा शिक्का असल्याचे समोर आले आहे. दिशाभूल व फसवणूक करण्यासाठी, सोने खरे आहे, असे भासवण्यासाठी या दुकानाचा शिक्का मारला असावा, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे. नगर शहर सहकारी बँक आणि संत नागेबाबा सोसायटीमध्ये सोन्याचे बनावट दागिने आढळून आले आहेत. याव्दारे फसवणूक झाली आहे. सध्या अटकेत असलेल्या आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाशी संबंधित आणखी काहींची चौकशीही पोलिसांनी सुरू केली आहे. त्यासाठी दोघांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

मात्र, बनावट दागिन्यांची तपासणी सुरू असताना यातील बहुतांशी दागिन्यांवर नगर शहरातील एका प्रतिष्ठित व मोठ्या सराफ दुकानाच्या नावाचा शिक्का मारल्याचे समोर आले आहे. बनावट दागिन्यावर हॉलमार्किंग करून व या दुकानाच्या नावाचा शिक्का मारून सदरचे दागिने खरेच आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला, असे तपासात समोर आले आहे. दरम्यान, हॉलमार्किंगसाठी वापरले जाणारे मशीन घेण्याचा सल्ला देणार्‍या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरचे मशीन हे भांड्यांवर नाव टाकण्यासाठी व डिझाईन करण्यासाठी वापरले जाते तसेच सांगून या मशीनची माहिती संबंधित आरोपींना दिली होती असे या व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे, या संदर्भात अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या