Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकर्ज फेडण्यासाठी छापल्या बनावट नोटा

कर्ज फेडण्यासाठी छापल्या बनावट नोटा

पुणे (प्रतिनिधी) | Pune –

कोट्यवधींचे कर्ज आणि लॉकडाउनमध्ये निर्माण झालेली पैशांची चणचण यामुळे एका व्यक्तीने मित्रांच्या मदतीने घरातच बनावट नोटा छापल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

पिंपरी पोलिसांनी हा प्रकार उजेडात आणला असून पाच जणांच्या टोळीला जेरबंदही करण्यात आलं आहे. साध्या कागदापासून ही टोळी नोटा तयार करत होती. त्यांच्याकडून प्रिंटर, रंग, स्कॅनर, कागदासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी सुरेश भगवान पाटोळे (वय ४०), प्रमोद अमृत गायकवाड (वय ३३) अख्तर इकबाल अकबर मिर्झा (वय ५७), खलील अहमद अब्दुलहमीद अन्सारी (वय ४०), नयूम रहीमसाहेब पठाण (वय ३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अख्तर हा मुख्य आरोपी असून तो एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असल्याने त्याने बनावट नोटा छापण्याचे धाडस केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर कोट्यवधींचे कर्ज होते, त्यात लॉकडाऊन झाले. मात्र, देणेकरांचे पैसे कसे द्यायचे याच्या विचारात ते होते. अखेर आरोपी खलील अहमद याने अख्तर मिर्झाच्या मदतीने पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली घरकुल येथे राहात असलेला आरोपी सुरेश पाटोळे याच्या फ्लॅटवर बनावट नोटा छापण्याचे काम सुरू करण्याची योजना आखली. त्यानुसार, त्यांनी ६ लाखांच्या बनावट नोटा छापल्याही. यांपैकी, काही नोटांवर रंग पसरल्याने त्या चलनात आणल्या नाहीत. मात्र, उर्वरित रक्कम त्यांनी एका कर्ज असलेल्या व्यक्तीला दिल्या. त्या व्यक्तीला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यातील बहुतांश आरोपी हे रियल इस्टेटशी संबंधित आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या