Thursday, April 25, 2024
Homeनगरबनावट सोने तारण प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र

बनावट सोने तारण प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. शहर बँकेच्या प्रकरणात 41 आरोपींविरूध्द 1150 पानांचे तर नागेबाबा मल्टीस्टेट प्रकरणात 63 आरोपींविरूध्द 1450 पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली.

- Advertisement -

शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शहर बँकेत आत्तापर्यंत 8933 ग्रॅम म्हणजे सुमारे नऊ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. याप्रकरणी 41 जणांविरूध्द गुन्हा दाखल असून, 3.22 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये 8564 ग्रॅम म्हणजे सुमारे साडेआठ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. या गुन्ह्यात 63 आरोपींचा समावेश असून आत्तापर्यंतच्या तपासणीत 2.88 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता आर्थिक गुन्हे शाखेने तपास पूर्ण करून शहर बँक प्रकरणातील 41 आरोपींविरूध्द 1150 पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे. तर नागेबाबा सोसायटी प्रकरणात 63 आरोपींविरूध्द 1450 पानांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नागेबाबा मल्टीस्टेटकडून आणखी 93 बनावट सोनेतारण खात्यांबाबत आर्थिक गुन्हे शाखेला माहिती देण्यात आली आहे. याचा तपास सुरू करण्यात आला असून तपास पूर्ण झाल्यानंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, आणखी काही एजंटांची नावे तपासात निष्पन्न झालेली आहेत. त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. बनावट सोनेतारण प्रकरणातील प्रमुख सहा आरोपी अद्यापही न्यायालयीन कोठडीत असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या