Saturday, April 27, 2024
Homeनगरसावधान! गुगलच्या बनावट कस्टमर केअर नंबरवरून फसवणूक

सावधान! गुगलच्या बनावट कस्टमर केअर नंबरवरून फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्याच्या काळात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहे. फसवणुकीच्या उद्देशाने सायबर गुन्हेगारांनी गुगलवर बनावट मोबाईल नंबर अपलोड करून ठेवलेला आहे. या नंबरवर फोन केल्यावर लोकांची फसवणूक झाल्याच्या पाच महिन्यांत 90 तक्रारी येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

मागील आठवड्यात नगरमधील एका महिलेने मैत्रिणीकडून कपडे मागितले होते. त्या मैत्रिणीने ते कपडे कुरिअरने पाठविले. कुरिअर मिळाले नाही म्हणून गुगलवर कुरिअर कंपनीचा कस्टमर नंबर शोधला. त्या नंबरवर फोन केल्यावर संबंधित महिलेची 80 हजारांची फसवणूक झाली. अशा फसवणूक झालेल्या तक्रारी सध्या सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पैशांच्या हस्तांतरणापासून ते विविध वस्तूंची खरेदी ही बहुतांश जण ऑनलाईन करतात.

विविध स्वरूपाची ऑनलाईन सेवा देणार्‍या बहुतांश कंपन्या मार्केटमध्ये कार्यरत आहेत. ऑनलाईन सेवा घेताना काही वेळेस पैशांचे ट्रांजेक्शन योग्य पद्धतीने होत नाही तर कधी ऑनलाईन मागितलेली वस्तू वेळेत घरी पोहोचत नाही अथवा चुकीची वस्तू मिळते. अशावेळी ग्राहक सदर कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून तक्रार नोंदवितो. ज्या कंपनीची सेवा घेतली आहे त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर बहुतांश लोकांना माहिती नसतो.

अशावेळी ग्राहक गुगलवर त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर सर्च करतात. बहुतांश वेळेस गुगलवरून बनावट कस्टमर केअर नंबर ग्राहकांना मिळतात. हे नंबर सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या उद्देशाने अपलोड करून ठेवलेले असतात. या नंबरला फोन केल्यानंतर गुन्हेगार तक्रार करणार्‍या व्यक्तीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करतात.

बनावट कस्टमर केअरला फोन लागला आहे हे बहुतांश जणांच्या लक्षात येत नाही. तक्रार नोंदवून घेण्याच्या नावाखाली तसेच रिफंड तत्काळ देण्याचे सांगून गुन्हेगार सदर ग्राहकांना काही अप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगतात किंवा मोबाईलवर लिंक पाठवतात. मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केले किंवा मिळालेल्या लिंकवर ओपन केल्यास पुढील प्रक्रिया केल्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातून पैसे जातात.

सायबर पोलिसांचे आवाहन

एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी केल्यास किंवा ऑनलाईन आर्थिक व्यवहारात अडचण निर्माण झाल्यास कुठल्याही कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करताना प्रथम तो नंबर अधिकृत आहे का, याची खात्री करून घ्यावी. कस्टमर केअरला फोन केल्यानंतर कुठलीही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू नये अथवा मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या