बनावट चेक प्रकरणी आणखी तिघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सीच्या नावे बनावट चेक तयार करून ते बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीतील आणखी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. संदीप पंजाबराव भगत, तुषार कुंभारे व पंचशील ज्ञानदेव शिंदे (सर्व रा. पुणे) असे अटक केेलेल्या आरोपींचे नावे आहेत. यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली होती. यामुळे आता अटक आरोपींची संख्या सात झाली आहे. अटक केलेल्या सात जणांना तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना 28 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सी यांच्या नावाने बनावट शिक्के तसेच बनावट व खोटे चेक तयार करून त्यावर खोट्या सह्या करत ते बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आठ जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सुरूवातीला विपूल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर, राहुल गुळवे या चौघांना अटक केली होती.

यानंतर शनिवारी पहाटे अजून तिघांना अटक केली. दिल्ली येथील एक आरोपी पसार आहे. दिल्ली म्युन्सीपल काउन्सिलच्या नावे अडीच कोटी रुपयांचा एक बनावट चेक विपूल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर हे घेऊन सावेडीतील स्टेट बँकेच्या शाखेत आले. त्यांनी बँकेत चेक वटविण्यासाठी दिला. या चेक बाबत शाखेतील मॅनेजरला शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर हा बनावट चेकचा प्रकार समोर आला.

संदीप भगत पोलीस दलात

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी संदीप भगत हा पुणे जिल्ह्यात राज्य राखीव दलात नोकरीला आहे. पोलीस दलात नोकरीला असतानाही त्याचा या बनावट चेक प्रकरणात सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले. बनावट चेक तयार करणे, ते चेक वटविणे व त्यातून येणार्‍या पैशात भगतचा वाटा असायचा अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी दिली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *