बनावट जन्मतारखेचा दाखला देणारा गजाआड

jalgaon-digital
3 Min Read

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्याशी लग्न करण्यासाठी शाळेचा दाखला व आधारकार्डच्या

जन्मतारखेत बदल करून हुबेहूब नक्कल तयार करून देणार्‍या येथील शौकत सुभेदार पठाण (वय 43 वर्ष) यास नगर येथील भिंगार पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामुळे देवळाली प्रवरा शहरात खळबळ उडाली आहे.

भिंगार ता.नगर येथील एका अल्पवयीन मुलीला आष्टी येथील सध्या नगरमध्ये रहिवासी असलेल्या तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. हे प्रेमीयुगल पळून गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी विवाह करण्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात लागणार्‍या कागदपत्रांची चौकशी केली असता त्यांना मुलाचा व मुलीच्या वयाचा पुरावा व आधारकार्ड आदी कागदपत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

परंतु प्रेयशी अल्पवयीन असल्याने तिचे वय वाढवून दाखला तयार करून देणार्‍या व्यक्तीचा शोध घेत असताना प्रियकराच्या देवळाली प्रवरा येथील मित्राने आमच्या गावात तुझ्या प्रेयशीचे वय वाढवून देणारा व्यक्ती असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अल्पवयीन मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला व आधारकार्ड आपल्या मित्राकडे देऊन काही रक्कम दिली.

त्या मित्राने गावातीलच स्क्रीन प्रिंटिंग चालक शौकत सुभेदार पठाण याच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला व आधारकार्ड देऊन या कागदपत्रावर जन्मतारखेत बदल करावयाचा असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे शौकत पठाण याने ठराविक रक्कम घेऊन आधारकार्ड व शाळा सोडल्याचा दाखला यातील जन्मतारखेत हुबेहूब बदल करून दिला.

दरम्यान भिंगार पोलिसांनी पळून गेलेल्या प्रेमीयुगलाचा शोध घेऊन ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीस पालकाच्या ताब्यात देताना पालकांनी अल्पवयीन मुलीचे लग्न विवाह नोंदणी कार्यालयात कसे लावले? असा प्रश्न उपस्थित केला व पालकांनी आपल्या मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला पोलिसांसमोर हजर करून मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने पोलीस चक्रावून गेले.

याबाबत पोलिसांनी प्रियकराला चौदावे रत्न दाखविताच त्याचे पितळ उघडे पडले. त्याने सांगितले, माझ्याबरोबर काम करणार्‍या मित्राच्या मदतीने देवळाली प्रवरा येथील शौकत पठाण याने मूळ कागदपत्रात हेराफेरी करून दिल्याचे कबूल केले. त्यावरून भिंगार पोलिसांनी देवळाली प्रवरा येथे येऊन शौकत पठाण यास ताब्यात घेऊन त्यास मूळ कागदपत्रात हेराफेरी केल्याप्रकरणी भा.दं.वि.कलम 468, 471 अन्वये भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौकत पठाण यास न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश बर्डेकोळी करीत आहेत. दरम्यान शौकत पठाण यास चोरीच्या मोटासायकल प्रकरणी बनावट कागदपत्र तयार करून देण्याच्या गुन्ह्यात दोन वर्षापूर्वी राहुरी पोलिसांनी गजाआड केले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *