राज्यात डोळ्यांंच्या साथीचे रुग्ण वाढले

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील डोळ्याच्या साथीच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असून ७ ऑगस्टपर्यंत रूग्णांची संख्या २ लाख ४८ हजार ८५१ इतकी झाली आहे. सर्वात जास्त म्हणजे ३४ हजार ४६६ रूग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले असून त्या खालोखाल जळगावमध्ये १९ हजार ६३२, पुण्यात १६ हजार १०५ रूग्ण इतकी संख्या आहे. तर मुंबईत १ हजार ८८२ रूग्ण संख्येची नोंद झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:चे घरातच विलगीकरण करून घ्यावे. हात सातत्याने धुवावेत. वैयक्तिक स्वच्छता ठेवावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही औषधोपचार करू नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी मंगळवारी केले. विभागामार्फ़त लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात येत असून ज्या भागात साथ सुरू आहे त्या भागात शाळेतील मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून उपचार करण्यात येत असल्याचे सावंत यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राज्यात सध्या डोळयांची साथ सुरू आहे. डोळे येणे हे मुख्यत्वे ॲडीनो व्हायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. यात रूग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होऊ नये म्हणून वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. वारंवार हात धुणे, डोळयांना हात न लावणे आदी गोष्टींचा समावेश आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.

ज्या भागात डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व जिल्हयांना आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाईप करून देण्यात आले आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *