Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणतांब्यात एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणार- रेल्वे राज्यमंत्री दानवे

पुणतांब्यात एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणार- रेल्वे राज्यमंत्री दानवे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा जंक्शन रेल्वे स्टेशनवरून जाणार्‍या काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न करून चांगदेवनगरच्या भुयारी मार्गाचे अर्धवट काम पूर्ण करण्याचे आदेश तात्काळ देणार तसेच नियोजित पुणतांबा-रोटेगाव रेल्वेमार्गासाठी सर्व शक्यता प्रशासकीय स्तरावर पडताळून पाहिल्या जातील. याकरिता रेल्वेची महाअदालत आयोजित करून राज्य सरकारला सहभागी करून घेतले पाहिजे, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ना. रावसाहेब दानवे शिर्डी येथे भाजपच्या संघटनात्मक कार्यशाळेकरिता उपस्थित राहिले असता त्यांची पुणतांबा परिसर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय धनवटे व सरपंच डॉ. धनंजय धनवटे व यांनी शिष्टमंडळासह जाऊन भेट घेत निवेदन दिले. शिष्टमंडळाशी चर्चा करताना रेल्वेकडून विकासात्मक कामे करून घेताना या परिसरातून प्रवाशांकडून वाढीव उत्पन्न मिळाले पाहिजे याचा मंत्री दानवे यांंनी आवर्जून उल्लेख केला.

पुणतांबा-रोटेगाव हा रेल्वे मार्ग करणे सर्वंकष बाजूने योग्य आहे. हे विजय धनवटे यांनी मंत्री दानवे यांना सांगताना म्हणाले, मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर पुणतांबा जंक्शन रेल्वे स्थानक आहे. येथून साईनगर शिर्डीकरिता रेल्वे मार्ग जातो. मराठवाड्यातून दक्षिण भारतात जाण्याकरिता अत्यंत जवळचा व सोयीचा रोटेगाव-पुणतांबा रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण रेल्वे मंत्रालय अंतर्गत झालेले आहे. हा मार्ग झाल्यास सध्या मनमाड मार्गे येणार्‍या रेल्वे गाड्यांचे अंदाजे 70 ते 80 किमी अंतर कमी होऊन वेळेची व आर्थिक बचत होणार आहे. रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्गाच्या जवळून मुंबई, नागपूर समृद्धी महामार्गावरील नियोजित धोत्रे स्मार्टसिटी प्रकल्प होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकर्‍यांचे शेती उत्पादन दुप्पट करण्याच्या संकल्पनेस हा रेल्वे मार्ग झाल्यास बळकटी येणार आहे. पुणतांबा रेल्वे स्टेशनवर लोको लॉबी कार्यान्वीत असून मालवाहू व प्रवासी रेल्वे गाड्यांचे ड्रायव्हर व गार्ड येथूनच बदलले जातात. तसेच हा मार्ग झाल्यास मोठ्या प्रमाणात रेल्वेचा कर्मचारी वर्ग व कर्मचारी निवास येथे उपलब्ध आहे. नवीन मार्गाच्या वाढीव मार्गिका टाकण्याकरिता रेल्वेच्या मालकीची जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

रोटेगाव-पुणतांबा मार्ग करताना कोणत्याही प्रकारचे मोठे पूल व इतर मोठे बांधकाम करण्याची आवश्यकता नाही. या मार्गासाठी भूसंपादन करताना शेत जमिनी भारत सरकारच्या नियमात उपलब्ध होणार आहे. सकारात्मक बाबी विचारात घेऊन या रेल्वेमार्गास आपल्या मंत्रालयाकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शाम माळी, गणेश कारखाना संचालक राजेंद्र थोरात, ग्रामपंचायत सदस्य योगेश घाटकर, प्रवासी संघटनेचे संतोष चोरडिया, दिलीप कांबळे, सुनील कुलट, भाजपा शहराध्यक्ष अमोल सरालकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या