कांद्यावर करपा व गव्हावर मावा महागड्या औषध फवारणीमुळे शेतकरी अडचणीत

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव सोनेवाडी परिसरात कांदा, गहू, हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात रोग आला असून शेतकर्‍यांना आपली पिके वाचवण्यासाठी कृषी सेवा केंद्रातून महागडी औषधे विकत घ्यावी लागत असल्याने शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे.

दोन दिवसांपासून या परिसरात थोडीशी थंडी असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आपले पीक पूर्ववत करण्यासाठी शेतकर्‍यांना अनेक औषधांची फवारणी करावी लागत आहे. शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून मोफत औषधे उपलब्ध करून मिळावी अशी मागणी सध्या परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. करपा व मावा रोगामुळे शेतकर्‍यांची पिके करपली असून औषध फवारणी केल्याशिवाय गत्यंतर नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

एका कीटकनाशक फवारणीला साधारणपणे दोन हजार रुपये खर्च शेतकर्‍यांना येतो आठ ते दहा दिवसांच्या अंतराने सध्या परिसरात फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कोपरगाव तालुका कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना कीटकनाशकांच्या फवारणीसाठी मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी किरण शिंदे व सागर जावळे यांनी केली आहे