Friday, April 26, 2024
Homeनाशिकरासाकाच्या धुराड्याकडे खिळल्या नजरा...

रासाकाच्या धुराड्याकडे खिळल्या नजरा…

निफाड। आनंदा जाधव Niphad

सन 2017-18 ला अवघे दीड लाख मे.टन ऊस गाळप करीत रासाकाची पाती थंडावली ती अद्यापपर्यंत सुरूच झाली नाही. निसाका कर्जाच्या ओझ्याखाली दबला तर कादवा गोदाने त्याच मार्गाने वाटचाल केली. त्यामुळे म्हटले तर कर्ज अन् नाही म्हटले 0 टक्के कर्ज अशा परिस्थिती असलेल्या रासाकाचा आता ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आशेचा किरण दिसू लागला आहे.

- Advertisement -

मात्र अद्यापपर्यंत तरी रासाकाची निविदा प्रसिद्ध होऊ शकली नाही. कारखाने बंद पडल्यापासून गोदाकाठ भागात दरवर्षी 5 ते 6 लाख मे. टन ऊस गाळपाअभावी शिल्लक राहत असून यावर्षी रसवंती बंद असल्याने त्यात भर पडू लागली आहे. त्यामुळे आता रासाकाचे धुराडे लवकर पेटावे ही आशा येथील शेतकर्‍यांना लागून आहे.

साखर सम्राटाचा तालुका अशी एकेकाळी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात आज तिनही साखर कारखाने बंद आहे. निसाका कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने बॉम्बे एस मोटर्सने तो भाडेपट्टयाने चालविण्याचा निर्णय घेतला. मात्र या कंपनीने प्रत्यक्ष करारच केला नाही. त्यानंतर जे.एन.पी.टी पोर्ट ट्रस्टची बोलणी झाली. पुढे बबनराव पाचपुते यांचीही निविदा आली. मात्र त्यांनीही रितसर करार न केल्याने कारखान्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.

सद्यस्थितीत निसाका कर्जाअभावी जिल्हा बँकेच्या ताब्यात असून अंदाजे 350 कोटीचे वर कर्ज असल्याचे बोलले जाते. निफाड तालुक्यात 10 ते 12 लाख मे.टन ऊसाचे क्षेत्र असून आजचा विचार केला तर याच परिसरातून कादवा एक ते दीड लाख मे.टन गाळप करतो तर संगमनेर दोन ते अडीच लाख मे.टन, द्वारकाधिश दोन ते अडीच लाख मे.टन, संजिवनी 50 हजार, कोळपेवाडी 25 हजार मे.टन ऊस गोदाकाठमधून दरवर्षी गाळपाला नेतो. तर उर्वरित ऊसापैकी रसवंती, गुर्‍हाळे व चार्‍यासाठी वापर केला जातो. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यापासून करोनामुळे रसवंतीगृहे बंद पडली तर अति पावसामुळे चार्‍याची टंचाई भासली नाही.

मागील वर्षापर्यंत तालुक्यात असलेले गुर्‍हाळे देखील बंद पडले. परिणामी ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले. आजही तालुक्यात 5 ते 6 लाख मे.टन ऊस गाळपाअभावी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत रासाका हाच शेतकर्‍यांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. कारण रासाकाची गाळप क्षमता 1800 मे.टन. परंतू प्रत्यक्षात प्रतिदिन 2200 मे.टन ऊसाचे गाळप केले जाते.

आजच्या परिस्थितीत रासाकावर 38 कोटी रु. कर्जाचा डोंगर असला तरी सन 2017-18 मध्ये संभाजीराजे उद्योग समूहाने हा कारखाना पोटभाडेपट्टयाने द्वारकाधिश कारखान्यास चालविण्यास दिला होता. त्यावेळी दीड लाख मे. टन ऊसाचे गाळप झाले. मात्र कमी गाळपामुळे कामगारांचे पगार न झाल्याने कामगारांनी न्यायालयात धाव घेतली.

परिणामी या हंगामातील साखर पोती विक्रीतून आलेले 53 कोटी रु. न्यायालयाचे आदेशाने बँकेत जमा आहेत. त्यामुळे ही रक्कम मिळाली तर रासाकावरील कर्ज शून्य होते. रासाकाची सभासद संख्या 13 हजार असली तरी हे सभासद ऊस उत्पादक नाही. त्यामुळे कारखान्याला गोदाकाठच्या ऊस उत्पादकांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

सद्यस्थितीत रासाकाची डिस्टलरी देखील सुस्थितीत असून संभाजीराजे उद्योग समुहाचे हरिभाऊ बागडे यांचेकडील कर्मचारी येणे हे 17 कोटी आहे तर वैद्यनाथ साखर कारखान्याकडून 1 कोटी 28 लाख रु. तर के.के. वाघ साखर कारखाना म्हणजेच अवसायक यांचेकडून 2 कोटी रु. येणे बाकी आहे. ही रक्कम मिळाली तर रासाका चालू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

रासाकासाठी ही सारी परिस्थिती अनुकूल असतांना व अवघ्या 300 ते 400 कामगारांच्या जोरावर पुन्हा रासाका सुरू करणे शक्य असतांना केवळ राजकीय साठमारीत म्हणा किंवा इच्छाशक्तीचा अभाव म्हणा रासाकाची निविदा अद्यापपर्यंत निघू न शकल्याने रासाका कृती समितीला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागला आहे.

भविष्यात रासाका सुरू होण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र कारखाना चालू झाल्यानंतर तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या कारखान्याला ऊस पुरवठा करणे गरजेचे आहे. अन्यथा रासाकाची चालू झालेली पाती पुन्हा थांबण्यास वेळ लागणार नाही. सहकारातील एक मोठी संस्था नव्या जोमाने उभी रहावी यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज असून हे योगदान दिल्यास रासाकाला पुर्नवैभव प्राप्त होणे अवघड नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या