Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखनागपुरकडून बर्‍या-वाईटाच्या विवेकाची अपेक्षा!

नागपुरकडून बर्‍या-वाईटाच्या विवेकाची अपेक्षा!

करोना पश्चात हृदयाशी संबंधित आजार करोना पूर्व काळाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढले आहेेत असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. भारतात मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे निष्कर्ष जगभरात पार पडलेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये नमूद आहेत. पद्मश्री डॉ.एस.सी.मनचंदा हे देशातील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञांपैकी एक आहेत. देशातील तरुणांचे हृदय कमकुवत होत चालले आहे असे मत त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत नोंदवले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यावर पहिल्या तासात योग्य उपचार मिळाले तर रुग्ण वाचण्याची शक्यता बळावते. हृदयाला कायमची इजा होणे टळू शकते. या तासाला वैद्यकीय व्यावसायिकांच्या भाषेत ‘गोल्डन अवर’ म्हणतात. रुग्णालयातील हृदयविकाराच्या रुग्णांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. असे रुग्ण, आरोग्य सेवक आणि डॉक्टरांना सहाय्यभूत ठरेल असे उपकरण नागपुरच्या डोझी या स्टार्टपअने तयार केले आहे. देशातील 250 पेक्षा जास्त रुग्णालयांमध्ये त्या उपकरणाचा वापर सुरु आहे. ‘डोझी’ नावाचे हे उपकरण रुग्णाच्या पलंगाखाली लावले जाते. त्यामुळे रुग्णाच्या हृदयाची गती, श्वसनदर, रक्तदाब, रुग्णाची अस्वस्थता, त्याच्या झोपेचा दर्जा अशी हृदयाशी संबंधित महत्वाची निरीक्षणे नोेंदवली जातात. काही वेगळे बदल दिसल्यास डॉक्टरांना तातडीने संदेश पाठवला जातो. त्यामुळे डॉक्टर रुग्णांवर योग्यवेळी उपचार करु शकतात. शिवाय डॉक्टरांना एका क्लिकवर वैद्यकीय तपासणीची अचूक माहिती मिळते. या उपकरणाच्या वापरामुळे हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होऊ शकते असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. जगातील अनेक देशांमध्ये हृदयविकाराशी संबंधित संशोधन केले जाते. त्यात तरुणांचा सहभाग वाढता आहे. सामाजिक समस्यांवर उपयोगी सिद्ध होईल अशा संशोधनाकडे तरुणाईचा कल वाढत आहे. सुरक्षित प्रसुतीसाठी सहाय्य करेल आणि प्रसुतीसमयीच्या वेदना कमी करेल असे उपकरण नागपूरच्याच तरुणांनी तयार केले आहे. त्याचे स्वामित्व हक्कही त्यांनी मिळवले आहेत. नागपूरची ओळख देशभरात अगदी वेगळ्या रीतीने आहे. महाराष्ट्र राज्यातील ते महत्वाचे शहर तर आहेच पण देशभरातील राजकीय सत्तेवर प्रभावी ठेवणारे नेतृत्व सध्या नागपुरकडे आहे. कमलेश घुमरे हा मालेगाव तालुक्यातील देवरपाडा येथील युवा शेतकरी. त्याने किटकनाशक फवारणीसाठी अनोखी सायकल तयार केली आहे. शेतातील पीकांवर किटकनाशकांची फवारणी करावी लागते. ती करताना किटकनाशकाशी संपर्काचा शेतकर्‍यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. वडिलांना होत असलेल्या त्रासामुळे कमलेश अस्वस्थ झाला आणि त्याने निरुपयोगी वस्तूंपासून ही सायकल तयार केली. या सायकलचे व्यावहारिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी त्याला एका उद्योगपतींनी आर्थिक सहकार्य केले आहे. या सायकल निर्मितीमुळे तो राज्यात ‘जुगाडू कमलेश’ नावाने ओळखला जातो. अशा पद्धतीचे सामाजिक भान वाढत असताना दुसर्‍या बाजूला गुन्हेगारीचाही आलेख वाढत आहे. ज्या नागपूरमधील तरुणांनी समाजोपयोगी उपकरणे तयार केली त्याच नागपूरमध्ये स्त्रीभ्रृण हत्येचे अमानुष प्रकरण उघडकीला आले. तेथील एका कचराकुंडीत पाच गर्भ पोलीसांना सापडले. या प्रकरणाची पोलीसांनी तातडीने चौकशी सुरु केली आहे. चांगले आणि वाईट या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी कोणत्या दिशेने जायचे आणि समाजाला न्यायचे हे जाणत्यांना ठरवावे लागेल. तरुणाईसमोर कोणता आदर्श ठेवायचे याचा विचार करावा लागेल. तरुणाईमध्ये फुटीरतेची बीजे पेरली गेली तर राजकीय स्वार्थाचे गणित साधले जाईलही कदाचित पण त्याची भविष्यातील फळे मात्र नक्कीच विषारी असतील याची खुणगाठ राजकीय नेत्यांना मारावी लागेल. तसे झाले नाही तर समाजातील नीतीमुल्यांची घसरण नागपुरपासूनच अधिक वेगाने सुरु होते का हा प्रश्न भारतीयांच्या मनात घोळत राहिल.

- Advertisment -

ताज्या बातम्या