Friday, April 26, 2024
Homeनाशिकशेतमाल विक्रीनंतर धनादेशाऐवजी रोख रकमेची अपेक्षा

शेतमाल विक्रीनंतर धनादेशाऐवजी रोख रकमेची अपेक्षा

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

केंद्र शासनाच्या आदेशान्वये व्यापारी शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारे देत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे

- Advertisement -

या प्रक्रियेत खा.डॉ. भारती पवार यांनी हस्तक्षेप करत शेतमालाचे पैसे रोखीने द्यावे असा आग्रह धरला असून त्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकर्‍यांना रोख पैसे मिळत नसल्याने त्याचा विपरित परिणाम येथील बाजारपेठांवर झाला आहे.

गेल्या महिन्यात लासलगावच्या कांदा व्यापार्‍यांची आयकर विभागाने तपासणी केली होती. यासंदर्भात केंद्र शासनाच्या यंत्रणांनी सूचना दिल्याचे बोलले जाते. त्याचा थेट परिणाम म्हणून व्यापारी शेतकर्‍यांना धनादेश देत आहेत. येथील बाजार समितीत कांद्यासह भुसार शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकर्‍यांना रोख पैसे न देता व्यापार्‍यांकडून धनादेश दिले जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना गरजेच्या वस्तू खरेदी न करताच हात हलवीत परत जावे लागते.

अन्य बाजार समित्यांत रोख पैसे मिळतात मग लासलगावला का मिळत नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात कांद्याचे भाव वाढले होते. त्यामुळे लासलगावच्या 11 व्यापार्‍यांवर आयकर विभागाने चौकशीच्या नावाखाली छापे घातले. हा चौकशीचा ससेमिरा मागे लावत शेतकर्‍यांनाही त्रासदायक ठरतील असे अनेक प्रश्न आयकर विभागाने विचारले. त्याचा त्रास आता थेट शेतकर्‍यांना होऊ लागला आहे.

चौकशीमध्ये शेतकर्‍यांना रोखीने पैसे देऊ नये, खरेदी केलेला माल शेतकर्‍यांचाच होता का? ते शेतकरी असल्याचा पुरावा काय? शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे देऊ नये अशा सूचना दिल्या. वास्तविक जिल्ह्यातील सर्व बाजार समिती कार्यक्षेत्रात शेतमाल विक्रीला येतो.त्यामुळे येथे सर्व शेतकरीच शेतमाल विक्रीला आणतात.

या चौकशीचा फार्समुळे नवी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत बाजार समितीने देखील तसा आदेश काढला. त्यामुळे खा. भारती पवार यांनी त्यात हस्तक्षेप करुन शेतीमालाचे पैसे रोखीनेच द्यावेत अशी मागणी केली आहे. लवकरच याबाबत आयकर विभागाशी चर्चा करू असेही खा. भारती पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता रोख व्यवहाराकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागून आहेत.

शेतमाल विक्रीनंतर रोख पैसे मिळावे

नवीन पीके उभी करण्यासाठी खते, औषधे, बियाणे घेण्यासाठी आमच्याजवळ असलेला शेतमाल मार्केटला विक्रीसाठी नेतो. परंतू माल विक्रीनंतर रोख पैसे मिळत नसल्याने रिकाम्या हाती यावे लागते. बँकेत चेक जमा करुन तो पास होईपर्यंत किमान आठवडाभराचा कालावधी जातो. इतर बाजार समितीत शेतमाल विक्रीनंतर रोख पैसे मिळतात. तशीच व्यवस्था लासलगावी व्हावी. जेणेकरुन शेतकर्‍यांच्या आर्थिक समस्या सुटून बाजारपेठाही गजबजेल.

राजाबाबा होळकर, (शेतकरी लासलगाव)

आयकर विभागाच्या धाडीनंतर येथील व्यापार्‍यांनी लासलगाव बाजार समितीला पत्र देऊन धनादेशाद्वारेच पैशांचे वाटप केले जाईल या प्रमुख अटीवरच व्यापारी लिलावात सहभागी झाले आहेत.

नरेंद्र वाढवणे, सचिव कृऊबा

.

शेतकरी हिताला प्राधान्य

आम्ही आधी शेतकरी हितालाच प्राधान्य देतो. परंतू आयकर विभागाने रोखीने पैसे वाटपावर प्रश्न चिन्ह निर्माण केले. त्यामुळे तसा निर्णय घ्यावा लागला. व्यापार्‍यांना होणार्‍या त्रासाबद्दलही कुणीतरी बाजू मांडली पाहिजे.

नंदकुमार डागा, व्यापारी

- Advertisment -

ताज्या बातम्या