Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअक्षय्यतृतीयेनिमित्त बाजारपेठेत उत्साह

अक्षय्यतृतीयेनिमित्त बाजारपेठेत उत्साह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्यतृतीया शनिवारी (दि.22) साजरी होणार आहे. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी केलेले जप, दान, ज्ञान हे अक्षय्य फळप्राप्ती देणारे असते. या दिवशी केलेल्या शुभकार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी देवांचे व पित्रांचे पूजन केले जाते.

- Advertisement -

अत्यंत शुभ अशा दिवशी स्नान, दान, जप, हवन, तर्पण इत्यादी गोष्टी केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. हिंदू धर्मानुसार अक्षय्यतृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम आणि हयग्रीवाचा अवतार घेतला होता, असे म्हटले आहे. महात्मा बसेवश्वर जयंतीही याच दिवशी साजरी होते. अक्षय्यतृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला महत्त्व आहे. यंदा पूजेचा शुभमुहूर्त शनिवारी सकाळी 7.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत आहे. पाण्याची घागर, पंखे, पादत्राणे (चप्पल-बूट), छत्री, जवस, गहू, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी समजले जाते. म्हणून बरेच जण या दिवसापासून पाणपोयाही सुरू करतात.

खान्देशातील दिवाळी

या सणाला खान्देशात आखाजी म्हणतात. प्रत्येक विवाहित महिला या सणानिमित्त माहेरी आलेली असते. झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असते. आबालवृद्धांना आमरस आणि पुरणाची पोळी यासह सांंजर्‍या आणि घुण्या अशा मिष्ठान्नांची मेजवानी मिळतेे. घरोघरी आगारी दिली जाते. पूर्वजांचेही मानोभावे स्मरण केले जाते. अक्षय्यतृतीयेला दिवाळीइतकेच महत्त्व असते. घरोघरी गोडधोड होते. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत खान्देशाची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्ट्य अशा प्रकारे जपून आहेत. स्त्रिया चैत्रात बसवलेल्या चैत्रागौरीचे याच दिवशी विसर्जन करतात. वर्षाच्या कराराने काम करणार्‍या सालदाराचा हिशेब याच दिवशी पूर्ण करून त्यास शेतकरी बंधनमुक्त करतात. सालदाराचा हा दिवस जुन्या मालकाकडील वर्षाचा शेवटचा दिवस असतो. याच दिवशी वाढीव रकमेवर शेतमजूर त्याच शेतकर्‍याकडे किंवा दुसर्‍या शेतकर्‍याकडे सालदार म्हणून करारबद्ध होतो. असा हा सण साजरा करण्यासाठी सर्वच सज्ज झाले आहेत.

अहिराणी विकास मंचची आखाजी

इंदिरानगर । पाथर्डी फाटा परिसरात अहिराणी भाषिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने गावाकडील उणीव भरून निघावी या हेतूने गजानन आर्केडसमोर, पार्वती हाईटशेजारी, श्री स्वामी समर्थनगर, पाथर्डी फाटा या ठिकाणी अहिराणी विकास मंचच्या वतीने खान्देशनी आखाजी सार्वजनिक पद्धतीने शनिवारी सायंकाळी चार वाजता साजरा करण्याचे ठरवले आहे. या उत्सवात पारंपरिक पद्धतीने महिलांना झोका खेळण्याचा मनसोक्त आनंद घेता येईल तसेच अहिराणी गाणी म्हणण्याची स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, आकर्षक गौराई सजावट स्पर्धा आणि उखाणे स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत जिंकणार्‍या भगिनींना पैठणी, सोन्याची नथ, चांदीचे करंडे, स्वयंपाक घरातील तवा व उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आलेली आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमृतधाम येथे उद्या कार्यक्रम

पंचवटी । पंचवटीतील अमृतधाम येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे शनिवारी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सकाळी 9 वाजता अक्षय्यतृतीयेच्या दिवशी कार्यक्रम होईल. उत्सवासाठी गुरुवर्य शिवाचार्य महाराज वडांगळीकर, आ. राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रियंका माने, पूनम मोगरे, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अरुण लद्दे, विलास कारेगावकर, विलास स्वामी जंगम, आशिष हिंगमिरे, प्रवीण हिंगमिरे, संतोष प्रमाणे, उमाकांत गवळी, प्रदीप लोहारकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या