Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रअतिरिक्त उसाच्या गाळपासाठी हार्वेस्टर ताब्यात घेण्याचे आदेश

अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी हार्वेस्टर ताब्यात घेण्याचे आदेश

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्वेस्टर ताब्यात घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. ताब्यात घेतलेले हार्वेस्टर गळीत हंगाम सुरु असणार्‍या साखर कारखान्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.

- Advertisement -

अतिरिक्त उसामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. पुढील वर्षीसुध्दा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील गळीत हंगामाचे सुध्दा योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

राज्यात यंदा चांगला पाऊस झाला. उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्टर्न शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आदी उपस्थित होते.

बैठकीत राज्यातील ज्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे, त्यांच्या हार्व्हेस्टर मशीन ताब्यात घेऊन ते गळीत हंगाम सुरु असणार्‍या कारखान्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश अजित पवार यांनी साखर आयुक्तांना दिले. साखर आयुक्तांनी हार्व्हेस्टरबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍यांना तातडीने सूचना द्याव्यात. शेतकर्‍यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या