Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकोरोना काळात महापालिकेचे उत्कृष्ट काम

कोरोना काळात महापालिकेचे उत्कृष्ट काम

धर्मेंद्र जगताप

धुळे – Dhule

- Advertisement -

महापालिकेने 2020 या वर्षात अनेक चढ-उतार पाहिले. सत्ताधारी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी दिलेला झटका, कचरा संकलन ठेकेदाराचा विषय या वर्षात चर्चेत राहिला तर कोरोना महामारी संकट काळात महापालिकेने उत्कृष्ट कामे केली. तसेच स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्राचा वापर केल्यामुळे महापालिकेला रजत पदक मिळाले ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर शहरात विकास गंगा वाहिल अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतू विकास कामांना गती मिळाली नाही. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यामुळे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक शीतल नवले यांना आंदोलन करावे लागले तर काही नगरसेवकांनी स्थायी व महासभेत सत्ताधार्‍यांना अडचणीत आणले. महापालिकेत उपमहापौर पद शोभेचे आहे, पदाला काही किंमत नाही असा रोष व्यक्त करुन उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी राजीनामा शस्त्र बाहेर काढले होते.

कचरा संकलनाचा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. मात्र कचर्‍याचे वजन वाढविणे, नियोजनाचा अभाव, घंटागाडीवरील कर्मचार्‍यांचे आंदोलन यामुळे सत्ताधारी गटही त्रस्त झाला आहे. ठेकेदारावर कारवाईचा विषय स्थायी व महासभेत 2020 या वर्षात चांगलाच गाजला आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, बंद पथदिवे, अधूनमधून उद्भवणारी पाणी समस्या, तापी योजनेला लागणारी गळती हे प्रश्न 2020 या वर्षात डोकेदुखी ठरली आहेत.

महापालिकेने कोरोना संकट काळात उत्कृष्ट कामे केली असली तरी कोरोनाचा फटका विकास कामांना बसला आहे. राज्य शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने विकास कामे ठप्प झाली आहेत.

महापालिकेतर्फे सर्वांसाठी घरकुल योजनेतंर्गत अतिक्रमण व झोपडपट्टी धारकांना हक्कांचे घरे देण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. आता लवकरच झोपडपट्टीधारकांना पट्टा वाटप करण्यात येणार आहे. तर महापालिकेतर्फे नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कराचा भरणा करणे सुलभ झाले आहे. तर बांधकाम परवानगीसाठी महापालिकेत फेर्‍या माराव्या लागत होत्या. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. त्यामुळे महापालिकेने ऑनलाईन परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून शहरात 2020 वर्षात भुमिगत गटारी, विविध ठिकाणी गार्डन अशी विकास कामेही सुरु आहेत. महापालिकेच्या 1100 कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. तर निवृत्त कर्मचार्‍यांना फरक रक्कम मिळणार आहे. स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर केल्यामुळे महापालिकेला रजत पदक मिळाले आहे ही बाब वर्षाच्या शेवटी महापालिकेचा बहुमान वाढविणारा आहे.

– मो.नं.99224 13458

- Advertisment -

ताज्या बातम्या