Friday, April 26, 2024
Homeनगरकरोना मृतांचे दाखले नातेवाईकांना मोफत घरपोहच पाठविणार

करोना मृतांचे दाखले नातेवाईकांना मोफत घरपोहच पाठविणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका हद्दीतील रुग्णालयात करोनामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूचा दाखला मोफत व घरपोहच मिळणार आहे. महापालिकेकडून तशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेत मृत्यूचे दाखले घेण्यासाठी होणार्‍या गर्दीला आळा बसणार आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेच्यावतीने करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत व घरपोहच मृत्यू दाखला देण्याचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून करोना रुग्ण उपचार घेण्यासाठी नगर शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. दुर्दैवाने यात काहींचा मृत्यू होतो. अशा मृत रुग्णांची महापालिकेकडे नोंद होत असते.

मृत रुग्णांवर महापालिकेकडून अंत्यसंस्कार केले जातात. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूच्या दाखल्यांची शासकीय, खाजगी कामांसाठी गरज भासत आहे. जुन्या महापालिकेत मृत्यूचे दाखले घेण्यासाठी गर्दी होत होती. यामुळे संसर्ग होण्याचा धोका होता. शिवाय जिल्हाभरातून रूग्णांचे नातेवाईक दाखले घेण्यासाठी नगरला येत होते. काहीवेळा त्यांना दाखला मिळत नसल्याने माघारी जावे लागत होते. आता मनपाने पुढाकार घेत दाखले घरपोहच देण्याची व्यवस्था केल्याने नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.

दलालांपासून सावधान

करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा धंदा काही दलालांनी सुरू केला आहे. जिल्ह्याभरातून रुग्णांचे नातेवाईक दाखले घेण्यासाठी मनपात येत होते. यावेळी दाखले मिळवून देण्यासाठी काही दलाल सक्रीय झाले होते. यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. आता मनपाने घरपोहच व मोफत दाखले देण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे नातेवाईकांनी मृत्यूच्या दाखल्यांसाठी कोणाला पैसे देऊ नयेत, कोणी पैसे मागितल्यास नातेवाईकांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या