सप्ताह घडामोडी : गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

jalgaon-digital
2 Min Read

दोन दिवसांच्या अंतराने दोन खूनाच्या घटनांनी जळगाव शहर हादरुन गेले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने जळगाव आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असुरक्षित वाटू लागले आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर पोलिस प्रशासनाच अंकुश ठेवू शकते. परंतु पोलिसांचे गुन्हेगारांवरील वचक आणि अवैध धंदेचालकांना असलेला पाठिंबा यामुळेच गुन्हेगारीला जिल्ह्यात पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळेच भुरट्या चोरट्यांसह गुन्हेगारी टोळ्या फोफावत असल्याने गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

दिवसेंदिवस जळगावात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत असणार्‍या घटना जळगावात घडत आहे. गेल्या आठवड्यात मित्रांसोबत दारु पिवून मित्रांकडील पैसे हिसकविण्याच्या रागातून गेंदालाल मिल परिसरातील रहिम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-25) याचा मित्रांनीच चाकूने भोसकून तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना घडली हेती. हे प्रकरण शांत होत नाही तोच दुसर्‍या दिवशी पिंप्राळ्यातील मयूर कॉलनीतून वाहणार्‍या नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पदरित्या वाहून आल्याने खळबळ माजली होती.

अद्यापर्यंत ओळख पटली नसली तरी पोलिसांकडून तरुणाची ओळख पटविण्यासाठी कसून तपास सुरु असतांनाच तिसर्‍या दिवशी अनैतिक संबंधातून हरिविठ्ठल नगरातील दिनेश काशीनाथ भोई (वय-28) या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करीत त्यांचा निर्घृण खून केला.

शहरात खूनाच्या घटनांसह गँगवॉरसारखे प्रकार दिवसाढवळ्या होवू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे गरजेचे आहे. परंतु पोलीस दलाकडूनच गुन्हेगारांना मिळणार्‍या राजाश्रयामुळेच आणि त्यांच्यावर असलेल्या वरदहस्तामुळेच गुन्हेगारी वाढत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी पोलिसींग करुन वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेळीच पाऊले उचलली नाहीत तर जळगावची ओळख बिहार झाल्याशिवाय राहणार नाही, यात तिळमात्र शंका नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *