पर्यावरण दिन विशेष : स्वच्छता, पर्यावरण क्षेत्रासाठी ‘मित्रा’

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सामाजिक, आर्थिक दृष्टिकोन स्वीकारुन पाणी, स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रासाठीची मुख्य संंसाधन संस्था म्हणून नाशिकच्या ‘मित्रा’ची वाटचाल सुरु आहे. सध्या ‘मित्रा’ संस्था राष्ट्रीय स्तरावर जलजीवन मिशनच्या माध्यमातून मुख्य संंसाधन केंद्र आहे. पुढील काळात मित्रा संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाणी, स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रासाठी ‘उत्कृष्ट केंद्र’ म्हणून गणली जावी यासाठी प्रयत्नशील आहे.

आज पर्यावरण दिन! त्यानिमित्त पर्यावरण रक्षणासाठी प्रभावी कार्य करणार्‍या संस्थांचा आढावा घेतला असता नाशिकच्या वैभवात भर घालणार्‍या महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा (मित्रा : महाराष्ट्र एन्व्हॅायरमेट इंजिनिंअरिंग ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च अकॅडमी)आवर्जून उल्लेख होत आहे. नाशिकच्या पोलीस अकादमी, नोट प्रेस, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ जसे राज्य स्तरावर प्रसिध्द् आहे तशीच ‘मित्रा’ ही देशभर काम करीत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे राज्यातील पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनांच्या नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. जागतिक बँक अर्थसहाय्य अंतर्गत निधीतून 1984 पासून नाशिक संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झाली. प्रशिक्षण केंद्र निर्मितीमागे प्रमुख उद्देश हा महाराष्ट्र पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेतील अभियंते, पर्यवेक्षक तसेच क्षेत्रीय चालक वर्ग यांना योजनांचे व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीबाबत प्रशिक्षण देणे असा होता.

सन 1985 पासून प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या कामास सुरुवात झाली. 1990 च्या काळात संस्था मान्यता प्राप्त झाली. राज्यामधील ग्रामपंचायत, नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महाराष्ट्र शासनाचे इतर विभाग या संशोधन केंद्रातील प्रशिक्षणांचा लाभ घेत होते. हळुहळू पण एका ध्येयाने प्रशिक्षण केंद्राचा विकास होत गेला आणि आज पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील एक अग्रगण्य प्रशिक्षण केंद्र म्हणून संस्था राष्ट्रीय स्तरावर नावारूपास आली आहे.

केंद्राची व्याप्ती ही वाढवण्याच्या दृष्टीने केंद्राचे नामकरण ‘महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था’ (मित्रा) असे करण्यात आले. ‘मित्रा’ संस्थेस स्वायत्त दर्जा बहाल करण्यात आला आहे. ‘यशदा’च्या धर्तीवर नियामक मंडळ, कार्यकारी समिती व मित्रा व्यवस्थापन अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली. ‘जलस्वराज्य टप्पा-2’ कार्यक्रमाअंतर्गत ‘मित्रा’च्या विकासाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला.

राष्ट्रीय संसाधन केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील जनतेचे जीवनमान सहज व्हावे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि ग्रामीण भागातील लोकांमधील विशेषत: महिला व बालके यांचे सामाजिक, आर्थिक जीवनस्तरात वाढ व्हावी, यादृष्टीने राष्ट्रीय जलजीवन मिशन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत सन 2024 पर्यंत प्रत्येक घराघरात पाणी पुरवण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे. या अंतर्गत ‘मित्रा’ संस्थेला राष्ट्रीय स्तरावरील मुख्य संसाधन केंद्र म्हणून केंद्र शासनाच्या जलशक्ती विभागाने नियुक्त केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *