Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात गटारीचा उत्साह

नाशकात गटारीचा उत्साह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सर्वत्र करोनाचा धोका असला तरी श्रावण महिन्यापूर्वीची अखेरची अमावस्या सोमवारी आल्याने बहूतांश नागरिकांनी रविवारीच गटारी साजरी केली. यासाठी बाजारात मांसाहार तसेच मद्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे चित्र होते.

- Advertisement -

करोनातही कित्येक टन मांस विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. या काळात बहूतांश नागरिक मांसाहार वर्ज्य करतात. यामुळे या महिन्याच्या प्रारंभी असणारी दर्श अमावस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी करण्याचा कल वाढला आहे. अमावस्या रविवारी दुपारी सुरू झाली असून ती सोमवारी दुपारी १२ पर्यंत असणार आहे. म्हणजे श्रावणातील पहिला सोमवारही येत आहे.

यामुळे सोमवार असल्याने अनेकांनी श्रावण महिन्यापूर्वी शेवटचे मांसाहार तसेच मद्यपान रविवारीच उरकून घेण्यास पसंती दिली आहे. तर अनेक मद्यपी आज १२ पर्यंत मद्यपान करणार असल्याचे नियोजन करताना दिसत आहेत. महिनाभर मांसाहार वर्ज्य असल्याने तत्पूर्वी शेवटचा आडवा हात मारण्यावर बहूतेकांनी प्राधान्य दिले.

यासाठी चिकन, मटन, मासे, अंडी यांच्या दुकानांवर गर्दी उसळली असल्याचे चित्र होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉजिंगसाठी परवानगी असली तरी अद्याप खाद्यपेयांसाठी हॉटेलांना परवानगी दिलेली नाही. यामुळे अनेक खवय्ये नाराज झाले आहेत. परंतु पार्सल सुविधेचा लाभ घेत अनेकांनी मांसाहारी हॉटेलमधून पार्सल मागवत गटारी साजरी केली. दुसरीकडे मद्यपींनी शहरातील सर्वच मद्य दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. अनेकजण चालता येणार नाही या स्थितीत होते. दुकानांमध्ये मद्य खरेदी करून मिळेत त्या ठिकाणी, आडोसा पाहून मद्यपी मद्यपान करत असल्याचे चित्र होते.

शहराबाहेरील विविध ठिकाणी अशा प्रकारची गर्दी दिसत होती. पावसाळ्यात नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्ग सौंदर्यस्थळे पोलिसांनी बंद केली असली तरी अनेक ठिकाणी दुसर्‍या मार्गाने जाऊन मद्यपी पार्ट्या साजर्‍या करताना दिसत होते. दरम्यान शहर तसेच ग्रामीण पोलिसांनी मद्य पिऊन गाड्या चालवणारांवर कडक कारवाई केली. विविध ठिकाणी तपासणी नाके उभारून वाहनांच्या चालकांची ब्रेथलायझरच्या साहाय्याने तपासणी करण्यात येत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या