Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसमाजातील दबावगट अधिक सक्रिय करण्याची गरज!

समाजातील दबावगट अधिक सक्रिय करण्याची गरज!

औरंगाबाद – aurangabad

महिलांवरील (Women) वाढता अन्याय, अत्याचार, हत्यांच्या घटना लक्षात घेता समाजातील दबावगटांनी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. समाजस्वास्थ्यासाठी सामूहिक जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. सतत नागरिकांचे प्रबोधन, समुपदेशन, (police) पोलिस प्रशासन व संबधितांना प्रश्न विचारून सामाजिक चळवळ गतिमान ठेवावी लागेल, असा सूर शहरातील महिलांच्या बैठकीत निघाला.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या कशीश प्रीतपालसिंह हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. या अनुषंगाने महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराबाबत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत महिलांच्या बैठकीचे आयोजन उल्कानगरी येथील आनंदी फाऊंडेशनच्या सभागृहात करण्यात आले होते. प्रारंभी मंगल खिवंसरा यांनी शहरातील महिला अत्याचारावर भाष्य केले. समाज आज मेलेल्या स्थितीत जगत आहे. आपले घर, आपले कुटुंब सुरक्षित असावे पण ज्या समाजात आपण राहतो त्यांची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ॲड.माधुरी अदवंत, अॅड. ज्योती पत्की यांनी महिलांच्या चारित्र्यावरून गुन्हा, तक्रारीला वेगवेगळ्या दिशा देणे चुकीचे असून याबाबत महिलांनीही कुठलेही विधान करताना काळजी घेण्याचे आवाहन केले. सविता कुलकर्णी यांनी महिलांच्या प्रकरणात पोलिसांचे होणारे दुर्लक्ष कथन करताना काही अनुभव सांगितले. अनुया दळवी, डॉ. रश्मी बोरीकर यांनी महिलांना सक्षम करताना समाजवास्तवाचे भान कसे जपावे यावर भाष्य केले.

डॉ.स्मिता अवचार यांनी पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना सुरक्षित जगता येत नाही, हे लज्जास्पद असून सर्व स्तरातील महिलांनी सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येऊन ठोस भूमिका घेणे करण्याची गरज असल्याचे सांगितले.डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी सातत्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर समाजाने कशा पद्धतीने प्रतिक्रिया देत प्रतिकार करावा याबाबत मार्गदर्शन करताना यात समुपदेशन किती महत्त्वाचे आहे यावर सविस्तर प्रकाश टाकला. विजया रहाटकर यांनी शहरात झालेल्या घटनांबाबत पोलिसांच्या तपासाची दिशा जाणून घेणे, राजकारण न करता महिलांच्या प्रश्नांवर एकत्र येणे, प्रत्येक शाळा-महाविद्यालय, सोसायटीनुसार तज्ञांची समिती स्थापन करून महिलांना आधार देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी सुनिता जाधव, मीना खंडागळे, मनिषा भन्साली, नीता पानसरे, संगीता धारूरकर, अमृता पालोदकर, साधना सुरडकर आदींची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या