Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही कॅरिऑनचा लाभ

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही कॅरिऑनचा लाभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोविडकाळात विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम त्यानंतरच्या परीक्षांवर झाला होता. विशेषत: अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा दोन वर्षांपूर्वी अतिशय कमी निकाल लागला होता. या विद्यार्थ्यांना संबंधित विषय महाविद्यालयांमध्ये शिकवण्यातच न आल्याने अनुत्तीर्ण विषय अजूनही त्यांना कठीण जात आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात अनुत्तीर्ण मात्र दुसर्‍या वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कॅरिऑनची सवलत देण्याची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला. याअनुषंगाने मंडळाने परिपत्रक प्रसिद्ध करत पदविकेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑनचा लाभ घेता येईल, असा निर्णय जाहीरकेला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरिऑन’चा लाभ देत थेट पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. करोनाच्या पार्श्वभूूमीवर गतवर्षी पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे शैक्षणिक कालावधी कमी मिळाला होता. शिवाय अनेक विद्यार्थ्यांचा बॅकलॉग राहिला आहे. त्या विद्यार्थ्यांनी दुसर्‍या वर्षातील अभ्यासक्रम नियमित उपस्थित राहून पूर्ण केला. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुसरे वर्ष सोपे गेले.

मात्र पहिल्या वर्षाचा बॅकलॉग अजूनही भरून निघाला नसलेल्या विद्यार्थ्यांना तिसर्‍या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी अनेक विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येऊन त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. दुसरीकडे स्वायत्त महाविद्यालयांनी प्रथम वर्षात बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना तिसर्‍या वर्षात प्रवेश दिला आहे. हाच न्याय तंत्रशिक्षण संचालनालयाशी संलग्न पॉलिटेक्निक महाविद्यालयांनाही मिळावा, अशी मागणी आ. फरांदे, यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या निर्णयाचा सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा देऊ, अशी ग्वाही पाटील यांनी दिली होती. आ. फरांदे यांच्या निवेदनाची दखल घेत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांकडे यासंदर्भात पाठपुरावा केला. त्याची परिणती म्हणजे मंडळाने परिपत्रक काढत कॅरिऑनला मान्यता दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या