Friday, April 26, 2024
Homeनगरमहावितरणच्या अधिकार्‍यांना उर्जामंत्र्यांचा करंट

महावितरणच्या अधिकार्‍यांना उर्जामंत्र्यांचा करंट

करंजी |वार्ताहर| Karanji

महाविकास आघाडीचे सरकार शेतकर्‍यांच्या बाजूचे व हिताचे आहे. वीज, पाणी हे शेतकर्‍याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

- Advertisement -

त्यामुळे पाण्याबरोबरच विजेला ही अत्यंत महत्त्व असून शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकर्‍यांनी विज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

शेती पंपाचा ट्रान्सफार्मर जळाल्याची शेतकर्‍यांची तक्रार येताच 24 तासात त्यांना नवीन ट्रान्सफार्मर बसून देण्यात यावा. जर याबाबत महावितरणकडून हलगर्जीपणा झाला तर संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील परिसरातील शेतकर्‍यांसोबत आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान कृषी धोरण 2020 या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या योजनेचे महत्त्व मंत्री तनपुरे यांनी शेतकर्‍यांना सांगितले.

कृषी पंपाच्या विजेची सुमारे 50 ते 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी झाली असून महावितरणचा हा गाडा पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांच्या सहकार्‍यांची गरज असून कृषी पंपाच्या वीज बिलातून जे पैसे महावितरणकडे जमा होणार आहेत. त्यातून 30 टक्के रक्कम त्या गाव परिसरातील विज रोहित्र व त्याच्या इतर देखभाल दुरुस्तीसाठी तर आणखी 33 टक्के रक्कम जिल्ह्यातील महावितरणाच्या इतर कामासाठी खर्च केली जाणार आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांनी महावितरणचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. ज्या भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे, त्या भागातील शेतकर्‍यांनी प्राधान्याने शेती पंपाचे वीज बिल भरले पाहिजे. त्याचबरोबर ज्या भागात उसाचे क्षेत्र नाही, त्या गावची परिस्थिती पाहुन निर्णय घ्यावा व शेतकर्‍यांनी देखील आपली गरज ओळखून सकारात्मक भूमिकेतून विजबिल भरण्यास सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री तनपुरे यांनी केले.

मोहोज खुर्द, मोहोज बुद्रुक येथील शेतकर्‍यांनी पाच हजार रुपयेप्रमाणे पहिल्या टप्प्यात सुमारे 7 ते 8 लाख रुपये भरून महावितरणला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच कृषी धोरण 2020 या योजने अंतर्गत शेती पंपाची एक रकमी रक्कम भरलेल्या आदिनाथ निंबाळकर, सुखदेव देशमुख, भानुदास गवारे, लिंबाहरी सोलाट, रेवजी सोलाट, शहादेव सोलाट, कुंडलिक मचे या शेतकर्‍यांचा देखील मंत्री तनपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता मनिष कुमार सूर्यवंशी, ग्रामीण सहाय्यक अभियंता भरत पवार, कनिष्ठ अभियंता हितेश ठाकूर, रमेश कुमार मिश्रा, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, सरपंच अमोल वाघ, आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष सुभाष गवळी, मार्केट कमिटीचे संचालक माणिकराव लोंढे, सरपंच अशोक दहातोंडे, जगनाथ लोंढे, सुधाकर वांढेकर, आदिनाथ सोलाट, उपसरपंच अरूण बनकर, माजी सरपंच शिवाजी मचे, सुरेश बर्फे, युवा नेते राजू शेख, भागिनाथ गवळी, जालिंदर वामन, शिवसेना उपतालुका प्रमुख भारत वांढेकर, बंडू झाडे, बापूसाहेब मिरपगार, सुरेश शिरसाठ, शिवाजी लवांडे, कारभारी गवळी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या