Friday, April 26, 2024
Homeनगरझोपड्या अन् टपर्‍यांचे अतिक्रमण काढा; अन्यथा आंदोलन

झोपड्या अन् टपर्‍यांचे अतिक्रमण काढा; अन्यथा आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील रेल्वे स्टेशनला स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक मिळालेला आहे.

- Advertisement -

मात्र, याचा रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता आता अतिक्रमित होत आहे. रेल्वे स्टेशन कडे जाणर्‍या मल्हार चौक ते शिवनेरी चौक या मार्गालगत सातत्याने नव्याने अतिक्रमणे व झोपड्या वाढत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस टपर्‍या व दुकाने थाटले जात आहेत. मनपाने तातडीने हे अतिक्रमण काढावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

स्टेशन रोडवरील आयकॉन पब्लिक स्कूल लगतची जागा प्राथमिक शाळा व क्रीडांगणासाठी प्रत्यक्षात आरक्षित आहे. तसेच त्यापुढील जागा ही भाजी मार्केट, व्यापारी संकुल व पार्किंग म्हणून आरक्षित ठेवण्यात आलेली आहे.

त्या समवेत बारा मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम रस्ता देखील प्रत्यक्ष नकाशा वर उपलब्ध आहे. ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन सध्या या महानगरपालिकेच्या रोडवर ही सर्व आरक्षण झुगारून बेकायदेशीररित्या अतिशय वेगाने पत्र्याच्या टपर्‍या एका एका दिवसात विकसित करून अतिक्रमण केले जात आहे.

त्यामुळे थोड्याच दिवसांमध्ये हा संपूर्ण भाग आरक्षित असूनही या ठिकाणी वेगाने बेकायदेशीर झोपड्या व टपर्‍या उभारण्यात येत आहे. मोठ्याप्रमाणात याभागात लोकवस्ती विकसित झालेली असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी भविष्याचा विचार करून या जागेवर हे आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.

मात्र काही महिन्यापूर्वी मोकळा असलेल्या रस्त्यावर आता अतिक्रमणे वाढत असल्याने रेल्वे स्टेशनला ये जा करणार्‍या नागरिकांना व वाहनांना अडथळे निर्माण होत आहे.

महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळेच हे अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे मनापा अधिकार्‍यांनी तातडीने बेकायदेशीरपणे केलेल्या या अतिक्रमनांवर कारवाई करत ही अतीक्रमणे जमीनदोस्त करावी.

अन्यथा परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा स्टेशनरोड भागातील विविध वसाहतीमधील सर्वसामान्य नागरिकांनी जिल्हाधिकारी व मनापा आयुक्तांना छायाचित्रांसह दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनावर जेष्ठ नागरिक संघाचे के.डी. खानदेशे, ज्ञानेश्वर कविटकर, नूर शेख, श्री. जोशी सर, श्री.लांडगे सर, दत्तात्रय फुलसौंदर, पंडित खुडे, विजय गायकवाड, चंदू शिपनकर, सागर पोळ, अनिल कावळे, राजू झेंडे आदी स्टेशन रोड भागातील नागरिकांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या