Friday, April 26, 2024
Homeनगरअतिक्रमण विरोधी मोहिमने दणाणले अनाधिकृतांचे धाबे

अतिक्रमण विरोधी मोहिमने दणाणले अनाधिकृतांचे धाबे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

नगरपरिषदेने पाथर्डी शहरातील अतिक्रमणे काढायला सुरुवात केली असून ही मोहिम पुढील काही दिवस अशीच जोरात सुरूच राहाणार आहे. यामुळे अनाधिकृत टपर्‍या धारकांचे धाबे दणाणले आहेत. टप्प्याटप्प्याने अतिक्रमणे काढली जाणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अतिक्रमणे काढल्यामुळे पाथर्डी शहराने मोकळा श्वास घेतला असुन नागरीकांमधून या मोहिमेचे स्वागत होत आहे.

- Advertisement -

नाईक चौक ते उपजिल्हारुग्णालय तसेच कोरडगाव रोड वरील नाईक चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंतचे सर्व रस्ते भव्यदिव्य दिसत आहेत. नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना यापुर्वीच नोटीसा दिल्या होत्या. अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. हे समजताच अतिक्रमण धारकांनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतः आपल्या टपर्‍या काढून घेण्यास सुरूवात केली.

शहरातील अजंठा चौक या ठिकाणी वीर सावरकर मैदानाकडे जाणार्‍या मार्गावर असलेले नगरपरिषदेची भाडेतत्त्वावरील गाळे रिकाम्या करण्याचे आदेश मुख्याधिकारी लांडगे यांनी व्यवसायिकांना दिले. त्यावेळी येथील व्यावसायिक म्हणाले की, आम्ही गेल्या 30 वर्षापुर्वीपासून या ठिकाणी व्यावसाय करतोय, पाथर्डी शहरात ग्रामपंचायत असल्यापासून या ठिकाणी आमच्या व्यवसाय सुरू आहे.

त्यामुळे आम्ही अतिक्रमण धारक नाही, आम्ही नगरपरिषदेचे भाडेकरू आहेत, भाडेपट्टीसह इतर कर भरत आहोत. त्यामुळे आम्हाला इथून हटविण्याचा संबंध येत नाही. आम्हाला इथून हटवायचे असेल तर आमच्या कुटुंबातील महिलांसह मुला – बाळांचे जीव घ्या आणि मग आमच्या दुकानावर जेसीबी चालवा असा आक्रमक पवित्रा घेतल्याने अतिक्रमण मोहिमेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्याधिकारी संतोष लांडगे, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी आयुब सय्यद, कर निरीक्षक सोमनाथ गर्जे, महेश कवादे, लक्ष्मण हाडके, सोमनाथ धरम, रविंद्र बर्डे, पंकज पगारे, दत्तात्रय ढवळे आदि मोहिमेत सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी बंदोबस्त तैनात केला होता.

अजंठा चौक येथील नगरपरिषदेच्या भाडेतत्त्वावरील गाळे पाडण्यासाठी कोणाचा दबाव आहे? नगरपरिषदेच्या जुने भाडे धारकांच्या जागा मोकळा करण्याचा घाट कोण घालत आहे? अचानक पणे काहींना नोटीस न देता त्यांचे अतिक्रमण काढून टपर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानी केले गेले. अतिक्रमण धारक व नगरपरिषद प्रशासन यांनी समन्वय साधून छोट्या छोट्या व्यावसायिकांना पर्यायी जागा देऊन अतिक्रमणातून मार्ग काढायला पाहिजे होता. असे प्रांताधिकारी प्रसाद मते यांना व्यापारी व छोटे व्यवसायिकांच्या उपस्थितीत निवेदन देत अतिक्रमणविरोधी मोहीम थांबवावी अशी मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या