Friday, April 26, 2024
Homeजळगावलोणजे ग्रामपंचायतीत ४३ लाखांचा अपहार

लोणजे ग्रामपंचायतीत ४३ लाखांचा अपहार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील लोंणजे/आंबेहोळ ग्रामंचायतीच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी १४ वा वित्त आयोगांतर्गत आलेल्या सुमारे ४३ लाख ६७ हजार ३७५ रूपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले असून या अपहाराच्या ५० टक्के रक्कम नोटीस मिळाल्यापासून १० दिवसात ग्रामपंचायतींच्या १४वा वित्त आयोगाच्या खात्यात भरणा करावी अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी नोटीस जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी बजावली आहे. लोंजे सरपंच व ग्रामसेवकांना अपहाराची रक्कम भरणेबाबत जिल्हा परिषदेने नोटीस बजावूनही, याबाबत संबंधीतांवर कुठलाच गुन्हा दाखल करण्यात आला नाही. हे विशेष म्हणता येईल.

- Advertisement -

तालुक्यातील लोंणजे/आंबेहोळ ग्रामपंचायतीत जिजाबाई ताराचंद जाधव ह्या सरपंच म्हणून कार्यरत असतांना तत्कालीन ग्रामसेवक नंदलाल किसन एशिराया यांचेशी संगनमत करून ग्रामपंचायतीस १४वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून रक्कम रूपये ४३,६७,३७५ रुपये (अक्षरी रक्कम रूपये त्रेचाळीस लक्ष सदुसष्टठ हजार तीनशे पंचाहत्तर मात्र) बँक खात्यातून आहरीत करून केलेल्या खर्चाच्या अनुषंगाने कोणतेही दस्तऐवज दप्तरी ठेवले नाही. यावरून या दोघांनी सदर रकमेचा अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे. यावरून सदर ४३ लाख ६७ हजार ३७५ रूपयांपैकी ५० टक्के रक्कम ३१ लाख ८३ हजार ६८७ रूपये ५० पैसे एवढे सरपंच व ग्रामसेवक हे वसुलीस पात्र ठरत आहेत.

ही वसुलपात्र रक्कम ही नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसा ग्रामपंचायत १४वा वित्त आयोगाच्या खाती भरणा करून केलेल्या रकमेचे चलन या कार्यालयास सादर करावे अन्यथा उक्त रक्कम तुमच्याकडून वसुलपात्र का करण्यात येवू नये याबाबतचा खुलासा या कार्यालयात ही नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसात सादर करावी असे नोटीसीत म्हटले आहे. ही वसुलपात्र रक्कम ग्रामपंचायतीस भरणा केल्याचे चलन किंवा उक्त रक्कम वसुल का करण्यात येवू नये ? याबाबत तुमचा खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास किंवा संयुक्तीस नसल्यास तुमच्या विरूद्ध महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.व्हिपीएम-२०१३/प्र.क्र.१३७/पंरा-३ दिनांक १२ जून २०१३ व महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.व्हिपीएम-२०१६/प्र.क्र.२५३/पंरा-३ दिनांक ४ जानेवारी २०१७ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दि.२८/८/२०२० रोजी बजावली आहे.

लोंणजे/आंबेहोळ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमातने १४वा वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केल्याचे व शासकीय दप्तर ग्रामपंचायत कार्यालयात नसल्याचे चौकशी करून संबंधीत अधिकार्‍यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना अहवाल पाठविला आहे.या अहवालाच्या अनुषंगाने सरपंच व ग्रामसेवक यांना गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चाळीसगाव यांनी दि.२५/८/२०२० रोजी ४३ लाख, ६७ हजार ३७५ रूपयांचा अपहार झाल्याचे सिद्ध होत आहे अशी नोटीस दिली आहे.त्यात सरपंच व ग्रामसेवक यांना दहा दिवसात संबंधीत रक्कम नोटीस मिळाल्यापासून १० दिवसात ग्रामपंचायत १४वा वित्त आयोगाच्या खाती भरणा करून भरणा केल्याचे चलन कार्यालयात सादर करावे असे नमुद केले आहे.मात्र आज काही अधिकारी व पदाधिकारी सारवा सारव करीत जुनी कामे नवीन दाखवत आहेत.

त्यामुळे संबंधीत अपहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा योग्य ती कारवाई करावी. संबंधीतांवर योग्य कारवाई न झाल्यास ग्रामस्थ पंचायत समितीसमोर उपोषणास बसतील असा इशारा लोंजे येथील रहिवासी कांतीलाल हिलाल राठोड यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चाळीसगाव यांना दि.१/१०/२०२० रोजी दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनाची प्रत खा. उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव यांनाही पाठविली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या