अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 23 तारखेला

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारच्या सुचनेनुसार जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी या ऑनलाईन प्रवेशात किचकट प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांची भंबेरी उडाली.

दरम्यान ऑनलाईन प्रवेशाची मुदत 17 तारखेला संपली असून आता 23 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ऑनलाईन प्रवेशास अडचण येत असल्याने ग्रामीण भागात अनेक महाविद्यालयांत ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली.

जिल्ह्यात 5 ऑगस्टपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना माध्यमिक विभागाने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांना दिल्या होत्या.

5 ऑगस्टपासून अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी आपापली संकेतस्थळ तयार केली असून त्यावर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच ज्या ठिकाणी पालकांना ऑनलाईन प्रवेश घेता येणार नाहीत, त्यांची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करण्याची सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या होत्या.

त्यानुसार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत कला, वाणिज्य, तसेच विज्ञान शाखांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. ही मुदत आता संपली असून आता 22 ऑगस्ट या कालावधीत दाखल अर्जांची महाविद्यालय पातळीवर छानी केली जाणार आहे. त्यानंतर 23 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी प्रत्येक महाविद्यालय आपापल्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करेल.

23 ऑगस्टपासून 28 तारखेपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला आणि जातीचा दाखला यानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. 3 सप्टेंबरला दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून 4 ते 8 सप्टेंबर दरम्यान दुसजया गुणवत्ता यादीनुसार शाळा सोडल्याचा दाखला आणि जातीचा दाखला यानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. 10 सप्टेंबरला संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयात जागा शिल्लक राहिल्यास तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

11 सायन्स अभ्यासक्रमास वेळ पुरणार का ?

31 ऑगस्टनंतर शाळा-महाविद्यालय सुरू होण्याबाबत निर्णय होणार आहे. आता शैक्षणिक वर्षातील दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी करोनामुळे वाया गेला असून शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यावर 11 सायन्यचा अभ्यासक्रम पूर्ण होणार का? अकरावीचे वर्षे हे बारावीच्यादृष्टीने विद्यार्थ्यांची पाया भरणी करणारे असते. यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *