Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकबसस्थानकात विजेची समस्या; सेवकांसह प्रवासीही अंधारात

बसस्थानकात विजेची समस्या; सेवकांसह प्रवासीही अंधारात

सिन्नर । वार्ताहर sinnar

गेल्या चार दिवसांपासून येथील बस स्थानक परिसरात विजेचा खोळंबा होत असून सायंकाळी चार नंतर दररोज वीज जात असल्याने संपूर्ण बसस्थानक परिसरच अंधारात गुडुप होत आहे. त्यामुळे येथील सेवकांसह प्रवाशांना अंधारात बसण्याची वेळ आली असून वीज वितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

जिल्हाभरात हायटेक म्हणून नावाजलेले सिन्नर बसस्थानक सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. बसस्थानक परिसरातील कचर्‍यामुळे प्रवाशांकडून नेहमीच नाराजी व्यक्त करण्यात येत असते. तसेच येथील स्वच्छतागृहातील अवस्छता व तेथील सेवकांच्या मनमानी कारभारामुळेही काही दिवसांपूर्वी बसस्थानक चर्चेत आले होते. मात्र, आता गेल्या 4-5 दिवसांपासून बस स्थानक परिसरात सायंकाळच्यावेळी वीज उपलब्ध नसल्याने संपूर्ण बसस्थानकच अंधारात गुडुप होत असल्याचे बघायला मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या बस स्थानकातून पुणे, नगर, नाशिक, धुळेसह अनेक जिल्ह्यात बससेवा पुरवली जाते. तसेच अनेक लांबच्या पल्ल्याच्या बसेसही येथे हमखास थांबतात. मात्र, त्यामानाने प्रवाशांना हवी तशी सुविधा बस स्थानकात उपलब्ध होत नाही. आता विजेच्या समस्येमुळे त्यात भरच पडली आहे. सायंकाळच्यावेळी ग्रामीण भागात जाणार्‍या प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. दररोज सायंकाळी 4 नंतर येथील वीज वाहिनीवरील थ्री फेज लाईन बंद होत असल्याचे सेवकांचे म्हणणे आहे. या बसस्थानकातून सायंकाळच्यावेळी ग्रामीण भागात फेरी मारणार्‍या व मुक्कामी जाणार्‍या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभतो.

कामानिमित्त सिन्नरमध्ये येणारे दिवसभराच्या कामानंतर शेवटच्या बसने गावी जात असतात. मात्र, सायंकाळनंतर बस स्थानकात प्रवाशांना अंधारातच बसावे लागत आहे. तर येथील सेवकानांही अंधारातच काम करावे लागत आहे. बसस्थानकात येणार्‍या-जाणार्‍या बसेसची नोंद करण्यासाठी ंसेवकांना आपल्या मोबाईलच्या टॉर्चचा वापर करावा लागत आहे. आगारप्रमुखांनी यात तातडीने लक्ष घालावे व बसस्थानकाला अंधारातून मुक्त करावे अशी मागणी प्रवासी करत आहेत.

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

गेल्या काही महिन्यांपासून बसस्थानकावर दिवसाढवळ्या बसची वाट बघत उभ्या राहणार्‍या प्रवाशांची पाकिटे, मौल्यवान वस्तू चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत. यात महिलांच्या गळ्यातील पोत चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांमधील एकही चोरटा शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मात्र, आता बसस्थानक रोज सायंकाळनंतर अंधारात जात असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येत असून चोरट्यांना यामुळे आयती संधी उपलब्ध झाली तर आश्चर्य वाटायला नको.

- Advertisment -

ताज्या बातम्या