Friday, April 26, 2024
Homeनगरमहावितरणची वीज सर्वात महाग; टाटा पॉवरची वीज सर्वात स्वस्त

महावितरणची वीज सर्वात महाग; टाटा पॉवरची वीज सर्वात स्वस्त

संगमनेर | Sangmner

राज्यात टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रीसीटी, बेस्ट यांच्यापेक्षा महावितरणाची वीज सर्वात महाग आहे.

- Advertisement -

त्यामुळे राज्यात महावितरणपेक्षा खाजगी कंपन्यांची वीज परवडली असे म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यात सर्वात स्वस्त दर टाटा पॉवरचे असून सर्वात महाग मात्र महावितरणची आहे. त्यातही राज्यात ग्राहकांना समाधान देणारा वीज पुरवठा करण्यात महावितरण यशस्वी होऊ शकलेले नाही.

साधारण शंभर युनिटकरिता महावितरणच्या ग्राहकांना प्रति युनिट 6.03 पैसे, बेस्टच्या ग्राहकांना 3.54 पैसे व अदानींच्या ग्राहकांना 7.29 पैसे व टाटांच्या ग्राहकांना मात्र अवघे 2.16 पैसे मोजावे लागत आहेत. पाचशेपेक्षा अधिक युनिट असल्यास महावितरण 13.54 पैसे आकारणी करते. बेस्ट 10.39 पैसे, अदानी 10.1 पैसे तर टाटा 9.81 पैसे आकारणी करीत आहे. तर व्यावसायिक दरासाठी 0 ते 20 किलोवॅट पेक्षा कमी भार असल्यास महावितरण 7.24 पैसे, बेस्ट 7.09 पैसे अदानी 7.48 पैसे तर टाटा 6.17 पैसे आकारणी करीत आहेत.

वीस पेक्षा अधिक भार असल्यास महावितरण 8.90 पैसे, बेस्ट 8.10 पैसे, अदानी 8.66 पैसे, टाटा 7.61 पैसे आकारणी होते आहे. राज्यात कृषी दरात केवळ महावितरण पुरवठा करीत असून तेथेही आकारणी देखील अधिक असल्याचे दिसत आहे. मीटर शिवाय 4.48 पैसे,मीटर सह 3.71 पैसे, तर इतर 7.95 पैसे आकारले जात आहेत. शासकिय शाळा, महाविद्यालयांना, रुग्णालये यांना 8.09 पैशाने आकारणी करण्यात येत असून रस्त्यावरील वीज देखील 6.51 पैशाने स्थानिक स्वराज्य संस्थेला पुरविली जात आहे.

राज्यात दरडोई वीज वापर 1021.5 युनिट आहे. व्यापारी वापर 106.8 युनिट, औद्योगिक वापर 378.7 युनिट, कृषी 237.1 युनिट, घरगूती वापर 238.6 युनिट आहे. देशाच्या सरासरीपेक्षा राज्यात घरगुती वापराचे प्रमाण अधिक आहे. राज्यात सर्वाधिक विजेचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी होतो आहे.

मागील वर्षी 46,507 दशलक्ष युनिट वापरण्यात आली. कृषीसाठी 29,118, घरगुती 29,175, वाणिज्य 13,010, सार्वजनिक सेवासाठी 6,579 व रल्वे करीता 184, इतर साठी 652 दशलक्ष युनिट वीज वापरण्यात आली आहे. औद्योगिकीकरणासाठी सुमारे 37 टक्के वीज वापरली जात असून कृषीसाठी 23.2 व घरगुतासाठी 23.4 टक्के वीज वापरली जात असल्याचे समोर आले आहे, चालू आर्थिक वर्षात महावितरणने 93,800 दशलक्ष युनिट खरेदी केली असून त्याकरिता 45 हजार 512 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सरासरी खरेदी दर 5.10 पैसे राहिला आहे.

महावितरणाची सर्वाधिक हानी

राज्यात सन 2020-21 मध्ये महावितरणची हानी 12.72 टक्के असून बेस्ट 3.71 टक्के, अदानी 7.55 तर टाटा पॉवरची हानी सर्वात कमी असून ती 2.05 टक्के आहे. टाटा पॉवरची हानी या वर्षी वाढली असून मागील वर्षीच्या दुप्पट झाली आहे. राज्यात महावितरणाचा हिस्सा हा 86 टक्के आहे.अदानी यांचा हिस्सा 6.7 टक्के, टाटा पॉवरचा 3.7 टक्के, बेस्टचा 3.6 टक्के राहिला आहे. राज्यात डिंसेबर पर्यंत 17,345 मेगावॅट कमाल मागणी राहिली असून पुरवठा मात्र 31, 841 मेगावॅट राहिला आहे.

महावितरणचे मोठे जाळे

राज्यात महावितरणचा हिस्सा सर्वाधिक असून त्यांचे जाळेही मोठे आहे. राज्यात 3899 उपकेंद्रे आहेत. 10,98,005 सर्किट किमी वाहिन्या व 7,18,868 वितरण रोहित्रे आहेत. तर महापारेष़णचे 48,805 सर्किट किमी जाळे असून 688 उपकेंद्रे असून पारेषणची हानी गेल्या काही वर्षात कमी झाली असून ती आता 2.86 वरती आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या