Friday, April 26, 2024
Homeनगरनऊ शेतकर्‍यांनी भरली साडेआठ लाखांची वीज थकबाकी

नऊ शेतकर्‍यांनी भरली साडेआठ लाखांची वीज थकबाकी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने थकीत शेती वीजग्राहकांच्या वीज वसुलीसाठी कृषी वीज धोरण- 2020 जाहीर केले आहे. त्या अंतर्गत थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन न तोडता वीज वसुलीसाठी राहुरी उपविभागाच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत 9 शेतकर्‍यांकडून 8.50 लाख रुपये पूर्ण रक्कम वसूल झाल्याची माहिती राहुरी उपविभागाचे उपभियंता धिरज गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

महावितरणच्यावतीने राज्यातील थकीत शेती वीज ग्राहकांसाठी कृषी धोरण 2020 ही योजना सुरू केली असून योजनेत थकीत वीज बिलाच्या व्याज, दंड, विलंब आकार पूर्णपणे माफ करून मूळ मुद्दलाच्या 50 टक्के माफ करून उर्वरित रक्कम मार्च 2022 पर्यंत भरण्याची संधी शेती वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यात पहिला हप्ता मार्च 2021 मध्ये व दुसरा हप्ता डिसेंबर 2021 मध्ये भरून घेतला. उर्वरित रक्कम व चालू बिल 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण भरल्यास त्या शेती वीजग्राहकास 60 ते 65 टक्के माफीची सवलत मिळणार असल्याचे महावितरणने जाहीर केले आहे.

रॅलीचे आयोजन महावितरणचे मुख्य अभियंता दिनेश कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता (अहमदनगर विभाग) सुनील काकडे यांच्या उपस्थितीत व विद्युत संनियंत्रण समितीचे सदस्य गंगाधर तमनर, महेश उदावंत, ग्राहक प्रतिनिधी पत्रकार संजय कुलकर्णी, प्रसाद मैड यांच्याहस्ते रॅलीस बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रारंभ करण्यात आला.

रॅलीत राहुरी उपविभागाचे उपभियंता धिरज गायकवाड, सर्व अभियंते, कार्यालयीन कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले. रॅलीची सांगता ब्राम्हणी येथे करण्यात आली. यावेळी सुमारे 70 किमी अंतरामध्ये रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महावितरणने कृषी धोरण 2020 सुरू केल्यापासून आज अखेर राहुरी उपविभागात 5 हजार 707 शेती वीज ग्राहकांनी एकूण 10 कोटी 83 लाख रुपयांची रक्कम वसूल झाली असून त्यात 1013 वीज ग्राहक पूर्णपणे थकबाकी मुक्त झाल्याचे धिरज गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या