Tuesday, May 14, 2024
Homeनगरवीज व पाणी प्रश्नावर महिला आक्रमक

वीज व पाणी प्रश्नावर महिला आक्रमक

शिंगवे |वार्ताहर| Shingave

राहाता तालुक्यातील शिंगवे येथे गणपती मंदिरासमोरील ओट्यावर ग्रामसभा पार पडली. महावितरण व पाणीपुरवठा या दोन विषयांवर महिलांनी जाब विचारत संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे ग्रामसभेत काही काळ गदारोळ पहावयास मिळाला. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता बाभुळके होत्या. ग्रामसभेला महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

- Advertisement -

यावेळी उपसरपंच प्रशांत काळवाघे, ग्रामसेवक दिनकर, कृषी अधिकारी शिंदे, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, राहाता तालुका समन्वयक उमा खरे, समुदाय आरोग्य विभागाच्या शितल सोनवणे, कामगार तलाठी व्हि.एच.कावनपुरे, महिला बचत गटांच्या सी आर पी कल्पना चौधरी, चेअरमन वसंत चौधरी उपस्थित होते संयुक्त पाणीपुरवठा योजना विषयांवर चर्चा करत असताना ग्रामस्थांनी काही काळ गदारोळ केला व पाणी पट्टी वाढवू नये अशी मागणी केली. महावितरण विभागाच्यावतीने वायरमन माहिती देत असताना महिलांनी धारेवर धरले. दिवसा लाईट असते तर रात्री लाईट नसते.

किती दिवस हाल अपेष्टा सहन करायच्या. आदिवासी भागात स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर द्या, अशी मागणी केली. महिला बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांनी माहिती दिली. कृषी विभागाचे अधिकारी श्री. शिंदे यांनी सांगितले, यावर्षी गावात डीबीटी अंतर्गत 20 लाखांपर्यंत कर्ज व अनुदान शेतकर्‍यांना दिले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मेहेरे यांनी सांगितले, शाळेतील पटसंख्या जास्त असल्याने येथे तीन शिक्षकांची मागणी केली आहे. त्यात दोन पदवीधर, एक शिक्षक पाहिजे कारण शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

अन्न सुरक्षा योजनेसाठी जे पात्र आहे त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा व जे नागरिक पात्र नाही अशा लाभार्थीनी स्वत:हून नांवे कमी करुन शासनास सहकार्य करावे अन्यथा नांवे आढळून आल्यास त्या ग्रामस्थांवर कारवाई केली जाईल. रुई आणि शिंगवे दोन गावांना कोतवाल नसल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करावे,असे आवाहन करत कामगार तलाठी व्हि.एच.कावनपुरे यांनी महसूल विषयी माहिती दिली.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या अधिकार्‍यांनी सांगितले, बुस्टर डोस ज्यांचा बाकी आहे त्यांनी आरोग्य केंद्रात येऊन बुस्टर डोस घ्यावा. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमच या ग्रामसभेत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांची उपस्थिती पाहून सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामसभेच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती महिलांना मिळाली. भविष्यात महिलांना याचा नक्कीच फायदा होईल, असे कामगार तलाठी कावनपुरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या