Thursday, April 25, 2024
Homeनगरविद्युत सहाय्यकपद भरतीबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक

विद्युत सहाय्यकपद भरतीबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

विद्युत सहाय्यक पदभरतीबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असून आरक्षणाचा वाद न्यायालयात गेल्याने काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. असे असले तरी यातून लवकरच मार्ग काढला जाईल. मी भरती प्रक्रियेच्या विरोधात नसल्याची ग्वाही ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. रविवारी राहुरी येथील शुभकिर्ती लॉन्स येथे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकार्‍यांचा मेळावा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

ना.तनपुरे म्हणाले, गेल्या दोन वर्षाच्या काळात ऊर्जा विभागाच्या माध्यमातून विविध कामे मार्गी लावली. ऊर्जा खात्यातील शेवटचा कर्मचारी हा विद्युत ग्राहकाशी जोडलेला असतो. त्यामुळे ग्राहक व अधिकारी कर्मचारी यांचा सुसंवाद असणे गरजेचे आहे. करोना सारख्या काळात जीव धोक्यात घालून ऊर्जा खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी अखेरपर्यंत कार्य केले. अनेक नैसर्गिक संकटे आली अनेकांना जीव गमवावा लागला प्राणाची बाजी लावून ग्राहकांना विद्युत सेवा दिली. तर काही जणांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महावितरण, पारेषण व निर्मिती या तीनही कंपन्यांतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संदर्भातील प्रलंबित व नव्याने निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

राज्य शासनाने हाती घेतलेले कृषी धोरण यशस्वीरित्या राबविण्यात ऊर्जा खात्यातील अधिकार्‍यांचा मोठा सहभाग राहिल्याने व ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने योजना सफल झाली. यापुढेही अधिक कार्य करून तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आरक्षणासंदर्भातील वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने विद्युत सहाय्यक पद भरती रखडलेली असली तरी त्यातून मार्ग काढण्याचा शासनस्तरावर प्रयत्न होत असल्याचे नमूद केले. राहुरी सारख्या विभागात 14000 विद्युत ग्राहक आहेत तुलनेत केवळ 14 कर्मचारी काम करतात याची आपणास कल्पना असून नवीन भरती झाल्यानंतर अधिक सुलभता येईल भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. तुलनेत ऊर्जा विभाग हे आव्हानात्मक काम करत आहे. विद्युत कर्मचार्‍यांना मारहाणीच्या घटनाही घडतात त्या निषेधार्ह असून कर्मचार्‍यांच्या पाठीशी विभाग कायम राहील, असे आश्वासन दिले. ऊर्जा विभाग हा आव्हानात्मक असून मी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ऊर्जा खात्याची मागणी केली होती. कोणताही अनुभव नसताना अभ्यास करून मार्गक्रमण करत आहे.

राहुरी तालुक्यातील मुळा प्रवरा वीज सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जात होता त्या अनुभवानुसार राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघात ग्राहकांच्या अपेक्षा आहेत. विजेची मागणी व पुरवठा यात मोठे अंतर असल्याने मतदार संघात 10 नवीन सबस्टेशन उभारण्यास मंजुरी मिळाली असून काम सुरू होईल वीज थकबाकी वसुली संदर्भात संवाद ठेवावा, असे आवाहन केले. विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे ,नागोराव मगर, प्रसाद रेशमे, सुनील काकडे यासह तीनही कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या