Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedएकनाथराव खडसे ४० वर्षांनंतर शरद पवारांच्या गळाला !

एकनाथराव खडसे ४० वर्षांनंतर शरद पवारांच्या गळाला !

जळगाव – Jalgaon – रवींद्र पाटील :

1980 मध्ये शरद पवारांनी जळगाव ते नागपूर काढलेल्या शेतकरी दिंडीत सहभागी झालेले एकनाथराव खडसे तब्बल 40 वर्षांनी शरद पवारांच्या गळाला लागले आहेत.

- Advertisement -

भाजपात आयुष्य वेचलेल्या एकनाथराव खडसेंचा शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत असला तरी राजकारणात प्रवेश घेण्यापूर्वीच त्यांचा शरद पवारांशी या कृषी दिंडीच्या माध्यमातून राजकारणाचा पहिला धडा त्यांनी शरद पवारांकडूनच घेतल्याचे कदाचित अनेकांना माहितही नसेल.

शरद पवार हे 1978 मध्ये पुलोद आघाडी करून पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनले होते. इंदिरा गांधींनी केंद्रात सत्तेत आल्यानंतर पुलोद सरकार बरखास्त केले होते. 1980 मध्ये निवडणुकीनंतर काँग्रेस (आय) पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आला.

ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पवार यांनी एस. काँग्रेसची स्थापना करुन काही महिन्यांतच सर्व डाव्या पक्षांसोबत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. 1980 मध्ये नागपूर अधिवेशनादरम्यान जळगाव ते नागपूर पायी दिंडीचे नेतृत्व शरद पवार आणि सहकार नेते राजारामबापू पाटील यांनी केले होते. यामध्ये एन.डी. पाटील, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, बबनराव ढाकणे आदींनी सहभाग घेतला होता.

7 डिसेंबर 1980 ला जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातून या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जळगावातून सुरू झालेली ही पायी दिंडी नागपूर विधिमंडळावर धडकली. त्यावेळच्या सरकारने त्यांना शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली होती. या दिंडीमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.

तत्कालीन एदलाबाद मतदारसंघाच्या आमदार होत्या काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील. यावेळी जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांचे सहकारी प्रल्हादराव एकनाथराव पाटील, हरिभाऊ दगडू जवरे यांच्यासह अनेक सहकारी सहभागी झाले होते.

खरे म्हणजे 1980 मध्ये हा मोर्चा निघाला तेव्हा तर शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेससोबत अनेक नेते असले तरी युवकांचा या मोर्चात मोठा सहभाग होता.

एणगावला होती दिंडीच्या जेवणाची व्यवस्था

याच मोर्चात राजकारणातील आवड असलेल्या एकनाथ खडसेंचादेखील सहभाग होता. हरिभाऊ जवरे, प्रल्हादराव पाटील यांच्यासोबत हा युवकदेखील या दिंडीत सहभागी झाला.

दिंडी दिवसा पायी चालयाची रात्री मुक्काम करायची. जळगावहून निघालेल्या दिंडीला तत्कालीन भुसावळ व आता बोदवड तालुक्यात असलेल्या एणगाव येथे जेवणाचा कार्यक्रम होता.

याचवेळी दिंडीत सहभागी झालेल्या खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यांच्या राजकारणाला येथूनच प्रारंभ झाला होता. या दिंडीनंतर 1985 मध्ये झालेल्या निवडणुकीत शरद पवारांच्या एस. काँग्रेसच्या तिकिटावर हरिभाऊ जवरे एदलाबादमधून विजयी झाले.त्याकाळातही खडसे हरिभाऊंसोबत दिसायचे.

परंतु, पुढे ते डॉ.अशोक फडके, उत्तमराव पाटील, डॉ.नागराज यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी खडसेंनाच भाजपात घेत 1990 च्या निवडणुकीत मैदानात उतरवत हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला बनविला आणि तो गेल्या निवडणुकीपर्यंत कायम होता. 40 वर्षांत खडसेंनी भाजपात काढल्यानंतर कोणत्याही कारणाने का होईना ते शरद पवारांच्या गळाला लागले, हे मात्र नक्की.

- Advertisment -

ताज्या बातम्या