घटस्थापनेच्या पहिल्याच माळेला खडसे राष्ट्रवादीत !

नंदुरबार – Nandurbar :

येत्या आठ दिवसांत एकनाथराव खडसे (Eknathrao Khadase) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये त्यांना स्थान देऊन

राष्ट्रवादी काँग्रेस थेट मंत्रीपदावर त्यांचे पुनर्वसन करणार आहेत. असा गौप्यस्फोट नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुन्हा केला आहे.

मी एकनाथराव खडसे यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी प्रवेश केला असे वक्तव्य केल्यामुळे उदेसिंग पाडवी दोन दिवसांपासून चर्चेत आहेत.

त्यापाठोपाठ आता पुन्हा ही माहिती प्रसारीत केल्यामुळे उदेसिंग पाडवी आणखी चर्चेत आले आहेत. पाडवी 2014 ते 2019 असे पाच वर्षे तळोदा-शहादा विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार होते.

तथापि ही टर्म पूर्ण झाल्यावर म्हणजे दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकी प्रसंगी उदेसिंग पाडवी यांची भाजपने उमेदवारी नकारली. म्हणून दोन वर्षापूर्वी भाजपाला रामराम ठोकून ऐनवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवूनही ते पराभूत झाले.

तेंव्हापासून माजी आमदार उदेसिंग पाडवी हे मोठी राजकीय संधी शोधत आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीचा पर्याय योग्य मानून नुकताच एक महिन्यापूर्वी त्यांनी मुंबई येथे जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे संघटन करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात पाडवी यांनी आपण एकनाथराव खडसे यांच्या सांगण्यानुसारच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवली होती.

दरम्यान पाडवी म्हणाले की, एकनाथ खडसे हे शरद पवार यांची भेट घेणार हे मला आधीच माहीत होते. ती भेट आटोपल्यावर मी स्वतः खडसेंना पुढचा निर्णय काय घेणार? असा प्रश्न केला होता.

त्या उत्तरात स्वतः खडसे म्हणाले आहेत की, घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश घेणार आहे. ही माहिती देऊन उदेसिंग पाडवी म्हणाले राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागा आहेत.

पैकी चार ते पाच राष्ट्रवादीच्या वाटेला येणार असून एकनाथराव खडसे यांना त्यात स्थान मिळेल व त्यांच्या उंचीनुसार महत्त्वाच्या पदावर त्यांचे पुनर्वसन केले जाणार हेही निश्चित झाले आहे. खडसेंकडे कृषिमंत्री पद येण्याची शक्यता असून यामुळेच मंत्रीमंडळातील खात्यांचीही फेराफार होण्याची शक्यता वाढली आहे.