Thursday, April 25, 2024
Homeनगरएकलहरेत दुचाकी चोरांचा धुमाकूळ

एकलहरेत दुचाकी चोरांचा धुमाकूळ

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे व परिसरात गेल्या एक महिन्यापासून चोरट्यांनी दिवस रात्र न पाहता मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून यामध्ये एकलहरे सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तथा ज्येष्ठ संचालक नूरअहेमद आजम जहागीरदार यांच्या राहत्या घरासमोरून शनिवारी मध्यरात्री त्यांची नवीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

- Advertisement -

एकलहरे आठवाडी, लजपतरायवाडी जवाहरवाडी, टिळकनगर ह्या हमरस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे.चोरांनी गेल्या एक ते दोन महिन्यांपासून दिवसा टेहळणी करून रात्री आपले लक्ष्य साधून वाड्या वस्त्यांवर चोर्‍या करीत आहेत. एकलहरे टिळकनगर या हमरस्त्यावरील प्रगतिशील शेतकरी जहागीरदार यांच्या बंगल्यासमोर अनेक गाड्या उभ्या असताना त्यातील एच. एफ. डीलक्स एम. एच.17 सी.एल. 0054 ह्या दुचाकी गाडीचे हँडल लॉक असताना देखील चोरट्यांनी हँडलचे लॉक तोडून ही दुचाकी चोरून नेली. सकाळी नमाज पठणासाठी जहागीरदार उठल्यानंतर आपली दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात येताच एकलहरेचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार जहागीरदार व इतरांना याबाबत माहिती दिली असता तात्काळ या भागातील शेतकर्‍यांसह वाड्या वस्तीच्या लोकांनी दुचाकीचा शोध घेतला मात्र त्यात यश न आल्याने तात्काळ एकलहरे गावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बेलापूर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. मात्र अद्यापही या दुचाकीचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही.

श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी आपल्या कामकाजाचा पदभार नुकताच स्वीकारला असून त्यांच्या पुढे आपल्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी विशेषतः चोर्‍या, दरोडे, दारू, मटका, जुगार सह अन्य गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. गुन्हेगारीची मागील परंपरा पुढे चालू न ठेवता गुन्हेगारी कशी रोखता येईल यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला कडक सूचना देऊन गुन्हेगार जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एकलहरे कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ चालू आहे. या आधीही बर्‍याच चोरीच्या घटना घडल्या आहेत. नूतन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, अशी जोरदार मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार आजम जहागीरदार, पत्रकार लालमोहमद जहागीरदार यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या