Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रCyclone Yaas : 'यास'चा परिणाम महाराष्ट्रावरही, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Cyclone Yaas : ‘यास’चा परिणाम महाराष्ट्रावरही, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

मुंबई | Mumbai

तौक्ते चक्रीवादळानंतर देशात ‘यास’ चक्रीवादळ आले आहे. ‘यास’ चक्रीवादळ बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ओरिसात धडकलं. या वादळाचा वेग ताशी ११० ते १२० किलोमीटर इतका होता. त्यामुळे ओडिसासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

- Advertisement -

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भातल्या काही भागांमध्ये पुढच्या तीन दिवसांत पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. इतकंच नाहीतर रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड, लातूर, अकोला, कोल्हापूर, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमिवर राज्यात अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे आदी विभागात मेघगर्जनेसह पावसाची अधिक प्रमाणावर शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाराही पाहायला मिळू शकेल. या वेळी वारे प्रतितास 30 ते 40 किलोमीटर प्रतीतास या वेगाने वाहू शकेल. विदर्भात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरवाती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. ढगाळ वातावरण आणि पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. तर, मध्यरात्रीनंतर हवेत गारवा तयार होत असल्याने पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत आहे. मात्र, दिवसभर काही ठिकाणी उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात चढउतार होत आहे.

यास चक्रीवादळाने बंगाल आणि ओडिशा राज्यात मात्र हाहाकार उडाला आहे. नुकसानीचे आकडे खूप मोठे आहेत. वादळाच्या तडाख्याने विजेचे खांब पडल्याने अनेक गावात वीज पुरवठा नाही, झाडे कोसळली आहेत. पंधरा लाख लोक बेघर झाले आहेत. अनेक ठिकाणी विमानांचे उड्डाणे रद्द केले आहेत. जवळपास एक कोटी लोकांना या वादळाचा फटका बसल्याचा दावा केला जात आहे.ओडिशा आणि पश्चिम बंगाल नंतर आज यास वादळ झारखंड राज्यात पोहोचणार आहे. त्यामुळे या राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडूनही परिस्थितीचा अंदाज घेण्यात येत असून राज्यांना मदत करण्यात येत आहे. या राज्यात मोठे नुकसान झाल्याचे दावे होत आहेत. मात्र, अद्याप किती नुकसान झाले याची आधिकृत माहिती मिळालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या