Friday, April 26, 2024
Homeनाशिकशैक्षणिक कर्जात माफी मिळावी

शैक्षणिक कर्जात माफी मिळावी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोनाच्या प्रादूर्भावामुळे सर्वच क्षेत्रात परिणाम झाल्याने आर्थिक प्रश्न उभा राहील आहे. वेतनकपात तसेच अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या सर्वसामान्य कर्जधरकांना केंद्राने काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

- Advertisement -

त्याच पध्दतीने आता शैक्षणिक कर्ज घेतलेल्या पालकांना सूट मिळावी,अशी मागणी छत्रपती राजे सेनेच्यावतीने सिन्नरचे तहसिलदार यांना करण्यात आली.

करोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून व्यापार, उद्योगांपासून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक फटका बसला आहे. मार्च महिन्यापासून नोकरी आणि रोजगाराच्या ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून, त्याचा फटका सर्वसामान्य कामगारांना बसला आहे.

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बहुतेक सेवाकांचे वेतन कापण्यात आले आहे. चैनीच्या वस्तूंसाठी घेतलेल्या कर्जावर सूट मिळत असताना शैक्षणिक कर्जावर सूट का मिळू नये? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. महागडे शैक्षणिक शुल्क असल्यास पालक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज काढतात. या कर्जाची परतफेड करण्यासाठी निकष बाजूला सारून बँकांकडून वसुली केली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

काही बँकांनी पैसे भरण्यासाठी पालकांशी संपर्क केला असल्याच्याही छत्रपती राजे सेनेकडे तक्रारी येत आहेत. मार्चपर्यंत पालकांनी रीतसर बँकांच्या कर्जाचा हप्ता भरला देखील आहे. परंतु , लॉकडाऊनच्या काळात आर्थिक परिस्थिती खालावल्याने बँकांचे कर्ज फेडणे कठीण होऊन बसले आहे.

बँकांनी कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला नसला तरी नंतरच्या काळात व्याजावर व्याज घेतल्यास कर्ज फेडणे कठीण होणार असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभुमीवर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शरद बोडके यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष भुषण देवरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ७) सेनेचे सिन्नर तालुका अध्यक्ष सुरेश सांगळे व सिन्नर तालुका संपर्क प्रमुख राकेश आंधळे यांच्यावतीने सिन्नर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

तसेच संपुर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या हितासाठी छत्रपती राजे सेनेच्यावतीने निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वेळ पडल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रस्त्यावर उतरुन निषेध देखील व्यक्त करु. तरी राज्य सरकारने शैक्षणिक कर्जात तत्काळ माफी देऊन, विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा , अशी मागणी सेनेच्यावतीने करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या