Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखजबाबदारीचा कानमंत्र !

जबाबदारीचा कानमंत्र !

आपण  भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलो असलो तरी आपल्या सर्व आमदारांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत आपण सगळे एक आहोत.

एखाद्या विषयावर आपली वेगवेगळी भूमिका असली तरी राज्यासाठी काय हिताचे आहे याचाच विचार आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. कर्जमाफी आणि सरकारचे अन्य निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम करा.

- Advertisement -

आपण आता मंत्री आहोत याचे भान ठेऊन वागा. उगाच कोणतेही मुद्दे किंवा विषयांवरून पाण्याच्या टाकीवर चढण्याचे आंदोलन करू नका. आता तुम्हाला कोणी खाली उतरवणार नाही’ असा कानमंत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाला दिला आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुजाण नागरिकत्वाचे धडे नागरिकशास्त्राच्या माध्यमातून दिले जातात. तसे धडे लोकप्रतिनिधींनाही देण्याची गरज उद्धव ठाकरे यांना जाणवली असावी.

यश किंवा सत्ता अचानक मिळाली तर भले-भले गांगरून जातात. आनंदाच्या भरात अकलेचे तारे तोडायला लागतात. आपण काय बोलत आहोत याचेही अनेकांचे भान सुटते. लोकप्रतिनिधींनीही वाचाळ बडबड करण्याचे प्रकार होतच राहतात. बेताल बडबडीसाठी साक्षी महाराज प्रसिद्धच आहेत. त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची जीभ इतकी वळवळू लागली आहे की, त्यांनी प्रक्षोभक विधाने करण्याचा संकल्पच सोडला असावा, असा जनतेचा समज झाला आहे.

अनेकांना माध्यमांशी बोलायला फार आवडते. स्वत:ला राज्यपाल म्हणवून घेणारेही ‘क्रियेवीण वाचाळते’पासून स्वत:ला अलिप्त ठेऊ शकले नाहीत. मुलांवर संस्कार केले तर बलात्काराच्या घटना कमी होतील, संस्कृतचा अभ्यास केला तर मधुमेहासारख्या व्याधींपासून स्वत:ला दूर ठेऊ शकाल, असे अकलेचे तारे एका राज्यपाल महाशयांनी जाहीरपणे तोडले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींना सुजाणतेचे शिक्षण देण्याची आवश्यकता कोण नाकारणार? उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा आणि राज्य चालवण्याचा अनुभव नाही. ते कारभार कसा करतील याची चिंता समाजातील चिंतातूर जंतूंना त्यांची निवड झाल्याक्षणी लागली आहे. तथापि लोकप्रतिनिधींना योग्य वेळी कानपिचक्या देण्याची व त्यांची कर्तव्ये आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याची निकड मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतली हे कौतुकास्पद आहे. खरे तर सूत्रे हाती घेताक्षणी इतक्या सुजाणपणाची अपेक्षा कोणाकडूनही करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शासन याचा मराठी माणसाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या जनताभिमुख राज्यकारभाराचे दाखले वारंवार दिले जातात. सहकारी मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचना तितक्याच जनताभिमुख आहेत हे लक्षात यावे. जनतेच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे याची आपल्या सरकारमधील लोकप्रतिनिधींना त्यांनी जाणीव करून दिली याचा मराठी जनतेला नक्कीच आनंद वाटला असेल.

पुरुषांचेच बौद्धिक सबलीकरण गरजेचे

राजकारणी  त्यांच्या खुर्च्या सोडायला तयार नसतात. त्यामुळे कर्तृत्व व योग्य पात्रता अंगी असूनही महिलांना राजकारणात योग्य वाटा अद्याप मिळत नाही. त्यांच्या क्षमतांना न्याय मिळत नाही. समाजातील प्रत्येक घरातील महिला ही बिनपदवीची एमबीए असते, असे अनेक विद्वानांनी म्हटले आहे. वाट्याला येईल त्या आर्थिक स्थितीत स्त्री संसाराचा गाडा ओढते. घराचे घरपण टिकवून मुलांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारीही उचलते.

अनेक महिला अशा चाकोरीबद्ध आयुष्यातही कर्तृत्वाचे झेंडे रोवतात. त्यांना राजकारण करणे अवघड जाईल का? कोनेरू हंपी ही भारताची बुद्धिबळपटू आहे. तिने महिलांच्या जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या सध्याच्या चौकटीत बाजी मारणारी कोनेरू ही पहिली भारतीय स्त्री आहे.

यापूर्वी 2017 मध्ये विश्वनाथन आनंदने खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले होते. बाळंतपण व बाळाच्या संगोपनासाठी कोनेरू हंपी बुद्धिबळापासून दूर होती. पोलीस प्रशिक्षण प्रबोनिधीच्या 117 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन नुकतेच पार पडले. यावेळी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला.

प्रशिक्षणार्थी विजया पवार यांनी अष्टपैलू व उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून अहिल्याबाई होळकर कपावर नाव कोरले. विजया यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी पितृछत्र हरपले. नंतरच्या काळात प्रथेप्रमाणे लवकर लग्नही झाले.

यथावकाश दोन अपत्ये झाली. प्रापंचिक जबाबदार्‍या व दोन मुलांचा सांभाळ करून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. काहीकाळ मुलांना आजीकडे सोपवले. त्यांचा दुरावा सोसून अभ्यास केला व यश मिळवले. त्या एवढ्यावरच थांबणार नाहीत. युपीएससी परीक्षा देऊन सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मेरी कोमनेही मुलांची जबाबदारी सांभाळून बॉक्सिंगमध्ये जगज्जेतेपद मिळवले होते. येथे प्रश्न लिंगभेदाचा नाही.

तथापि किती पुरुष अशी जबाबदारी पार पाडू शकतील? संसाराचा भार पेलतील व दोन-तीन मुलांचा सांभाळ करून अन्य क्षेत्रातही कर्तृत्व गाजवतील? पण समाजावर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा स्त्रियांचे कर्तृत्व झाकून ठेऊन पौरुषाचे प्रदर्शन करतो. अजूनही अनेक घरांत प्रत्येक गोष्ट त्यांच्याच इच्छेप्रमाणे पार पडावी हा पुरुषांचा हेका असतो.

पती-पत्नी दोघेही नोकरदार असले तरी सायंकाळी घरी गेल्या परतल्यावर पुरुषाला निवांतपण हवे असते आणि बाईला मात्र पदर खोचून कामाला जुंपून घ्यावे लागते. महिलांच्या सबलीकरणासाठी सरकार व सामाजिक संस्था अनेक योजना राबवत आहेत. पुरुषीपणाच्या दांभिकतेने पुरुष त्यावर यथास्थित पाणी फिरवतात.

तरीही महिलांचे कर्तृत्व आता अनेक क्षेत्रात सिद्ध झाले आहे. यावरूनच राजकारणापासून स्त्रियांना अलिप्त ठेवणार्‍या पुरुषांच्याच बौद्धिक सबलीकरणाची गरज स्पष्ट होते. मात्र अंगवळणी पडलेल्या पुरुषी अहंकारामुळे हे वास्तव किती भारतीय पुरुष मान्य करतील?

- Advertisment -

ताज्या बातम्या