वर्षभरात खाद्यतेलाचे भाव झाले दुप्पट

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या जगण्यातील अत्यावश्यक वस्तू महाग होत चालल्या आहेत. मागील वर्षभरात खाद्यतेलांच्या किंमतीत एकसारखी वाढ होत आहेत. वर्षभरापूर्वी 74 रूपये प्रतिलिटर मिळणारे सोयाबीन तेलाचे दर 150 रूपयांवर पोहचले आहे. यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या भावात विक्रमी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले आहे.

वर्षभरापूर्वी देशात कोरोना संसर्गाने धडक दिली आणि सर्वच स्तरातील वस्तूंचे भाव वाढण्यात जणूकाही स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र आहे. यातच सामान्य नागरिक हा रोज कष्ट करून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी संषर्घ करीत आहे. वर्षभरापासून जगण्यातील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीत सारखी वाढ होत आहे.

विशेषतः किराणा सामानातील प्रत्येक वस्तूंच्या किंमतीत मागील काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. त्यातच कोरोना आणि त्यास रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे एमआरपीचा उल्लेख नसलेल्या काही वस्तूंच्या किंमती जाणीवपूर्वक व्यापारी वर्गातूनच वाढविण्यात येत असल्याचे प्रत्ययास येत आहे. यात रोजच्या खाण्यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे खाद्यतेल. मागील वर्षभरापासून गॅस व पेट्रोलप्रमाणे एकसारखी खाद्यतेलांच्या किंमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे गोडतेल समजले जाणारे आज कडूतेल झाले आहे.

खाद्यतेलात सूर्यफुल, शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, पाप रिफाइंड, करडी, सरसो आदी तेलाचे प्रकार आहेत. यात सामान्यांकडून अधिक प्रमाणात सोयाबीन व पाम रिफाइंड तेलाचा वापर केला जातो. आज या दोन्ही तेलांच्या किंमतीत मोठी म्हणजे 100 टक्के अधिक वाढ झाली आहे. गतवर्षी कोरोना येण्यापूर्वी सोयाबीनचे दर प्रतिलिटर 74 ते 80 रूपये होते. ते आज 144 ते 150 रूपयांवर पोहचले आहे. तेलांच्या भावाविषयीची माहिती न्यु बालाजी तेल भांडारचे मालक विनोद चोंडिया यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *