Thursday, April 25, 2024
Homeनगरई-पॉस यंत्रे कालबाह्य झाल्याने स्वस्त धान्य वितरण खोळंबले!

ई-पॉस यंत्रे कालबाह्य झाल्याने स्वस्त धान्य वितरण खोळंबले!

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना एनआयसी कंपनी दिल्ली मार्फत 2017 मध्ये धान्य वाटपासाठी दिलेल्या टू जी सिस्टीम असलेल्या ई-पॉस मशीन कालबाह्य झाल्यामुळे त्याद्वारे ग्राहकांच्या अंगठा अथवा बोटाचा ठसा घेऊन धान्य वाटप करण्याचे काम डोकेदुखी झालेली असल्यामुळे वारंवार ई-पॉस मशीन मध्ये राज्यभरात अडचण येत असून मागील सात-आठ दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील स्वस्त धान्य वाटप ऐन सणासुदीच्या दिवसात बंद आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाने संपूर्ण देशातील रेशनिंग व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बद्दल करून दुकानदारांना ग्राहकांच्या अंगठा अथवा बोटाचा ठसा ई पॉस मशीनवर घेऊन त्याद्वारे धान्य वाटप करण्याची प्रक्रिया सन 2017पासून सुरू केलेली आहे. या कामासाठी एनआयसी नवी दिल्ली या कंपनीकडून ई पॉस मशीन दुकानदारांना दिलेल्या आहेत. त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी इटेगरा कंपनी बंगलोर यांचेकडे काम दिलेले आहे. या कामांचे संपूर्ण पैसे केंद्र शासनाने या कंपनीला देऊन त्यांच्यावर या संदर्भात जबाबदारी दिलेली आहे.

परंतु त्या काळात टू जी सिस्टीम सुरू असल्यामुळे या मशीनमध्ये टू-जी सिस्टीमचे सिम टाकून डाटा अपडेट केलेला आहे.परंतु सन 2017पासून पुढे एक ते दोन वर्षे सन 19 ते 20 पर्यंत मशीन व्यवस्थित कार्यरत होत्या व नेटवर्क सुध्दा चांगले मिळत होते. परंतु आता देशात फोर जी सिस्टीम सुरू झाली असून पुढील काळ 5 जी येणार आहे. सध्या दुकानदारांकडे असलेल्या ई पॉस मशीनमध्ये एनआयसी कडून नवीन नवीन सॉफ्टवेअर अपडेट करण्यास सांगितले जाते. त्याचा परिणाम दोन तीन महिने दिसतो नंतर पुन्हा जैसे थे मशीन बंद पडते. थंब न घेता नेटवर्क कमी येणे असे प्रकार होऊन मशीन बंद पडतात. यामुळे ग्राहकांना व दुकानदारांना नाहक त्रास होत असून कार्ड धारकांना कामधंदे सोडून चार पाच वेळा धान्यासाठी दुकानांमध्ये येऊन चकरा मारावे लागतात, ही परिस्थिती नेवाशापुरती नसून अहमदनगर जिल्ह्यात देखील आहे.

ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात मागील मे महिन्याचे जरी धान्य येऊन पडले तरी त्या धान्याचे वाटप दुकानदारांना करता येईना.त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन हा स्वस्त धान्य दुकानदार व कार्ड धारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी कार्ड धारकांकडून होत आहे.

तालुक्यातील धान्य पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.त् यामुळे धान्य वाटपाला नेमका कशामुळे विलंब होत आहे याची अधिकृती माहिती मिळाली नाही.

हा सध्या टेक्निकल इशू सगळीकडेच येत आहे. तरी वरील पातळीवर टेक्निकल प्रॉब्लेम वर काम सुरू आहे. त्यात काम लवकर पूर्ण होऊन साधारणपणे दोन ते तीन दिवसांत ई-पॉस मशीन व्यवस्थितरित्या पूर्ववत सुरळीत चालू होतील. तालुक्यातील जवळपास सर्वच स्वस्त धान्य दुकानात धान्य आलेले आहे. त्यानंतर लगेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार स्वस्त धान्य कार्ड धारकांना धान्य वाटप सुरू करतील.

– रुपेशकुमार सुराणा तहसीलदार, नेवासा

यंत्रातील दोष दूर झाल्याशिवाय धान्य वाटप नाही

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना कार्डधारकांकडून रोज विचारणा होत आहे, पण तालुक्यातील दुकानात धान्य दुकानदारांनी धान्य घेऊन देखील वाटप करता येत नाही. त्यातच कार्ड धारकांना देखील रोज तोंड द्यावे लागत आहे. ई-पॉस मशीनवर ग्राहकांचा अंगठा अथवा बोटाचा ठसा घेतल्याशिवाय धान्य देता येईना. बिगर ठसा घेता धान्य वाटप केले तर उद्या कोणीही धान्य मिळाले नसल्याची तक्रार करू शकतो. त्यामुळे ई-पॉस मशीन चालू होईपर्यंत तरी धान्य वाटप करता येणार नाही असे चित्र दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या