‘ई पीक पाहणी’ची शेतकर्‍यांवर सक्ती नको

jalgaon-digital
2 Min Read

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

राज्यामध्ये सद्यस्थितीत शेतकर्‍यांनी शेतातील पिकांची पीक पाहणी करण्याकरीता ‘ई पीक पाहणी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांचे शेताचा सर्व्हे नंबर, गट नंबर, एकूण क्षेत्र, पोटखराबा क्षेत्र तसेच शेतातील पिके यांची माहिती ई पीक पाहणी सॉफ्टवेअरमध्ये शेतकर्‍यांनीच स्वतः भरून व फोटो काढून अपलोड करणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया किचकट व गुंतागुंतीची असल्याने या प्रक्रियेद्वारे पीक पाहणी करण्याऐवजी शासकीय यंत्रणांकडूनच पीक पाहणी करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात नवाज शेख यांनी म्हटले आहे की, आजमितीस राज्यातील शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये अँड्रॉईड मोबाईल फोन नाहीत. असल्यास साधे व केवळ संभाषणापुरते फोन आहेत. काहींकडे अँड्रॉईड फोन असल्यास त्यामध्ये इंटरनेटचे बॅलन्स नाही. सॉफ्टवेअर करीता आवश्यक स्पेस नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच अनेक खेडेगावात इंटरनेटशी संबंधित अडचणी आहेत. त्यामुळे गरीब व अर्धशिक्षीत सामान्य शेतकरी बांधवांसाठी ई पीक पाहणी कार्यक्रम डोकेदुखी ठरत आहे.

सदर ई पीक पाहणीची माहिती शेतकरी बांधवांनी विहीत मुदतीत न भरल्यास 7/12 वरील पिकाचा तक्ता निरंक राहील व शेतकरी बांधव पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानाचे अनुदान, पीक विमा यांसारख्या अनुदानापासून वंचित राहतील, असे संदेश शासकिय यंत्रणेकडून प्रसारीत करण्यात येत आहेत. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी गोंधळुन गेले असून त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी सध्या सुरु असलेली ई पीक पाहणी कार्यक्रमाची शेतकर्‍यांवर सक्ती न करता पुर्वीप्रमाणेच ऑफलाईन पीक पहाणीची नोंद प्रचलीत पध्दतीने सुरू ठेवावी, किंवा शासकिय यंत्रणेकडूनच प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या शेतावर जावून ई पीक पाहणी कार्यक्रम राबवावा, असे शेख यांनी म्हटले आहे.

वास्तविक राज्यातील शेतजमिनी व त्यांमधील पिके यांची पाहणी करणे, त्याबाबतच्या आवश्यक नोंदी ठेवणे याकरिता कृषी विभाग व महसूल विभाग अशा शासनाच्या स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असताना ई पीक पाहणीची अंमलबजावणी सामान्य शेतकर्‍यांकडून करून घेणे चुकीचे व अन्यायकारक आहे. ई पीक पाहणी हे डिजीटल भारताच्या प्रगतीचे पाऊल असले तरी ग्रामिण भारतात अनेक सुविधांचा व साधनांचा अद्याप अभाव असल्याने ई पीक पाहणीसाठी प्रचंड गोंधळाची परीस्थिती निर्माण झाली आहे, हे नाकारता येणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *