Thursday, April 25, 2024
Homeनगरबेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍यांवर मोका लावणार

बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍यांवर मोका लावणार

कर्जत |वार्ताहर| Karjat

कर्जत श्रीगोंदा व जामखेड तिन्ही तालुक्यातील वाळू माफियांना मोका लावणार असून बेकायदेशीर वाळू उपसा

- Advertisement -

कोणी करत असेल तर तो बंद करावा, असा इशारा कर्जत येथे नव्याने हजर झालेले डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

कर्जत उपविभागामध्ये डी. वाय. एस. पी. म्हणून अण्णासाहेब जाधव हे नवीन अधिकारी रुजू झाले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

कर्जत, श्रीगोंदा व जामखेड या तिन्ही तालुक्यांमध्ये भीमा सीना यासह सर्व नदी पात्रांमधून बेकायदेशीर मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा सुरू आहे या पार्श्वभूमीवर बोलताना डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी वाळू माफिया सर्वच गुन्हेगारी क्षेत्राला इशारा देताना सांगितले आहे की यापुढे उपविभागामध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही.

वाळू माफियांना प्रसंगी मोका लावणार परंतु कोणालाही सोडणार नाही जर कोणी वाळूउपसा करीत असेल तर तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, असे खुले आव्हान डी. वाय. एस. पी. जाधव यांनी दिले आहे यावेळी श्री.जाधव म्हणाले की , कोणत्याही गावात यापुढे विनापरवाना वाळू उपसा होणार नाही जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी तशा सूचना दिल्या आहेत आणि मागील काही दिवसांपासून याची अंमलबजावणी सुरू आहे .जर कोणाही व्यक्तीला जर वाळू उपसा सुरू असल्याची आणि वाळू वाहणारी गाडी दिसली तरी कळवा.त्या वाहनांवर आणि मालकावर कडक कारवाई केली जाईल.

जाधव म्हणाले, सर्वसामान्य माणसाला पोलीस विभागाविषयी आदर आहे आणि त्यांना सुरक्षा देताना त्यांच्या मनात पोलीस विभागाविषयी भरवसा निर्माण करणार आहोत.यासाठी कर्जत श्रीगोंदा आणि जामखेड या तिन्ही तालुक्यांत नागरिकांसाठी सेल निर्माण करणार आहोत, हा विभाग त्यांचे नेहमीचे काम करतानाच या विभागासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणार आहोत. महिलांसाठी विशेष सुरक्षा उपविभागामध्ये महिलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यावर आपला भर राहणार आहे.यासाठी निर्भया पथक तयार करणार आहोत

कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यांमध्ये टेक्निकल गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते ते कमी करण्यावर भर राहील. प्रत्येक तक्रारीची शहानिशा ,तपासणी काटेकोरपणे केली जाईल व ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्यांना निश्चित पद्धतीने न्याय मिळवून दिला जाईल.

गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न

उपविभागात श्रीगोंदा, जामखेड तालुक्यांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता येथे विशेष प्रयत्न केले जातील. यासाठी घडणारे गुन्हे व गुन्हेगार यांची पार्श्वभूमी, गुन्ह्याची पद्धत यासह विविध घटनांचा बारकाईने अभ्यास करून त्यावर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. हे करतानाच कर्जत तालुक्यासह इतरत्र मोठ्या प्रमाणात संघटित गुन्हेगारी फोफावली हीदेखील आपण मोडून काढणार आहोत. कायदा व पोलीस यांच्याविषयी आदर आणि भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असणे गरजेचे आहे, असेही अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या