Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक१५ मार्चपासून 'हा' उड्डाणपूल राहणार बंद

१५ मार्चपासून ‘हा’ उड्डाणपूल राहणार बंद

नाशिक | Nashik
पंचवटीतील क. का. वाघ कॉलेजपासून जत्रा हॉटेलपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी १५ मार्चपासून द्वारका ते क. का. वाघ चौकापर्यंतचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या काळात पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे नियोजन शहर वाहतूक शाखा करत आहे, त्याबाबतची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. शहर पाेलीस आयुक्त दिपक पांडेय यांच्यासह पोलिस उपायुक्त पोर्णिमा चाैगुले- श्रींगी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे महाप्रबंधक बी. एस. साळुंखे, व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी पोलिस आयुक्त कार्यालयात या महामार्गाच्या कामाबाबतचे प्रेझेंटेशन दाखविण्यात आले.

- Advertisement -

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी के. के वाघ महाविद्यालयापासून जत्रा हॉटेलपर्यंतच्या परिसरात उड्डाणपूल उभारणीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अमृतधाम ते जत्रा हॉटेल येथे उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. १८ मे २०२१ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी महामार्ग प्राधिकरणाने केली आहे.

तीन फेजमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक मार्गात बदल केला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली. १७ डिसेंबर म्हणजेच पहिल्या फेजला सुरुवात झाली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत हा फेज सुरू राहणार आहे. या काळात सर्व्हिस रोडलगतचा पुलाखालील रस्ता टप्प्याटप्याने बंद करण्यात येणार आहे.

परंतु, सर्व्हिस रोड सुरूच राहणार असल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम होणार नाही. २० जानेवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार असून, या काळात काही प्रमाणात वाहतुकीत बदल केले जातील. १५ मार्च ते ३० एप्रिलपर्यंतचा तिसरा टप्पा अधिक महत्त्वाचा असून, या कालावधीत द्वारका चौक ते के. के. वाघ कॉलेजपर्यंतचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.

१ मेपासून ताे उड्डाणपूल खुला
१ मे २०२१ पासून जत्रा हॉटेलपर्यंतचा उड्डाणपूल वाहनधारकांसाठी खुला केला जाणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत बाेलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या