Thursday, April 25, 2024
Homeशब्दगंधफटका धुळीच्या वादळाचा!

फटका धुळीच्या वादळाचा!

नुकत्याच आलेल्या धुळीच्या वादळाने नंदुरबारपासून कोल्हापूरपर्यंत आणि मुंबईपासून अहमदनगरपर्यंच्या नागरिकांचा जीव टांगणीला लावला. या वादळात जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी वादळामुळे निर्माण झालेल्या गारव्याचा, हाडं गोठवणार्‍या थंडीचा मानव, प्राणी, पक्षी आणि एकूणच निसर्गावर परिणाम झाला. म्हणूनच यानिमित्ताने अशी वादळे का होतात, त्यांचा परिणाम काय होतो हे समजून घ्यायला हवे.

गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता जगात कुठे ना कुठे धुळीची वादळे येत असतात. ती का येतात यासंबंधीचा भौगोलिक आणि शास्त्रीय अभ्यास नसला तर लोक काहीही ठोकताळे लावतात. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात चीनमध्येही धुळीचे वादळ आले होते. त्याने शेकडो लोकांचा बळी घेतला. भारतात 2020 आणि 2021 या दोन वर्षांत धुळीच्या वादळांनी हजेरी लावली नाही नसली तरी 2019 आणि 2018 मध्ये धुळीच्या वादळाने मोठी हानी केली होती. दिल्ली, राजस्थान अशा परिसरात शेकडोंना याचा फटका बसला होता. आता पाकिस्तानातील कराचीतून भारतात आलेल्या धुळीच्या वादळाने आपला प्रताप दाखवला.

धुळीच्या वादळाने भारतातल्या अनेक राज्यांमध्ये दृश्यमानता कमी झाली. गाड्या रद्द कराव्या लागल्या. आंबा, पोफळी, द्राक्ष आदी बागांचे नुकसान झाले. अचानक अतिशीत लहरी आल्याने त्याचा जवळपास सर्वच पिकांना कमी-अधिक फटका बसला. अंगात हुडहुडी भरवणारा थंडगार वारा न सोसण्याजोगी अनेकांची स्थिती झाली. हवेची गुणवत्ता खालावली. लोकांना सर्दी, खोकला, थंडी, तापाने घेरले.

- Advertisement -

करोनाच्या काळात हे एक नवीनच संकट आले. व्हायरल इन्फेक्शनने दवाखाने आणि औषधांची दुकाने भरून गेली. याखेरीज याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागली. ऊन गायब आणि काही ठिकाणी पाऊस अशा वातावरणामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती उभी ठाकली.

या पार्श्वभूमीवर बघायचे तर धुळीचे वादळ कशामुळे तयार होते या विषयावर खूप कमी लोकांना अभ्यास आहे हे जाणून घ्यायला हवे. त्यामुळेच पाकिस्तानने तर काही कुरापत काढून जैविक वादळ तयार केले नाही ना, असा प्रश्नही अनेकांनी जाहीरपणे विचारला. पाकिस्तानकडून आलेल्या धुळीच्या वादळामुळे मुंबई, पुण्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वातावरण धुलिमय झाल्याचा अनुभव आला.

धुळीच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी झाल्याचे दृश्य होते. दिवसाच्या कमाल तापमानातही लक्षणीय घट नोंदली गेली. मुंबईत तर कधी नव्हे ते स्वेटर बाहेर निघाले. महाराष्ट्रासाठी धुळीचे वादळ नवे नसले तरी याचा विचार होणे गरजेचे आहे. आखाती देशांकडूनही धुळीचे लोट भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे सरकत असल्याचे उपग्रहीय चित्रांत दिसल्यामुळे हा वाढता धोका लक्षात घ्यायला हवा.

नुकत्याच येऊन गेलेल्या धुळीच्या वादळामुळे मुंबईतले रस्ते, वाहने आणि झाडांवर मोठ्या प्रमाणात धूळ जमा झाली होती. या परिस्थितीमुळे मुंबईच्या प्रदूषणाचा निर्देशांक वाढला. गुजरातवर निर्माण झालेले धुळीचे वादळ आणि मुंबईमध्ये वाहणारे पश्चिमी वारे यांच्या संयुक्त प्रभावामुळे मुंबईमध्ये धुळीचे वारे वाहत होते. नंदुरबार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनीही हजेरी लावली. याचा थेट परिणाम वाहतुकीच्या वेगावरही झाला. पालघर ते रत्नागिरी आणि नंदुरबार ते सातारा या भागात धुळीच्या वादळाचा जास्त प्रभाव दिसून आला.

मुंबईमध्ये कुलाबा येथे 24 तर सांताक्रूझ येथे 23.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा पारा होता. अवघ्या 24 तासांमध्ये कुलाबा, सांताक्रूझमध्ये सुमारे सहा अंशांनी कमाल तापमानाचा पारा उतरला होता. हे तापमान कुलाबा येथे सरासरीपेक्षा 5.8 अंशांनी आणि सांताक्रूझ येथे 6.9 अंशांनी कमी होते. सांताक्रूझ येथे जानेवारीतील गेल्या दहा वर्षांमधील हे सर्वात कमाल तापमान होते.

गेल्या 10 वर्षांमध्ये 2020 मध्ये 25.3 अंश सेल्सिअस हे सर्वात कमी कमाल तापमान होते. त्यानंतर 2022 मध्ये नवा विक्रम नोंदवला गेला. दिल्लीत तर यंदा गेल्या 122 वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला. धुळीच्या वादळामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट नोंदवला गेला. मुंबईत माझगाव, वरळी, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, भांडुप या भागात हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदवली गेली. मालाड भागात हवेचा दर्जा ‘धोकादायक’ असा नोंदवला गेला. वाढलेल्या थंडीत आता पावसाच्या शक्यतेने बागायतदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना आता अवकाळीने झोडपले तर बळीराजा आणखी संकटात सापडणार यात शंका नाही.

एकीकडे अशी स्थिती असताना सध्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढले असून तेही चिंतेचे कारण असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे. सहारा वाळवंटात ऐतिहासिक बर्फवृष्टी सुरू आहे. त्याचेही परिणाम जाणवू लागले आहेत. सिमेंट आणि वीज निर्मितीमुळेही वातावरणात बदल घडत असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी व्यक्त केले आहे. मानवजात आणि पृथ्वीवरील विनाशाची ही सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यातच धूळयुक्त हवेचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असून सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली होती. परंतु कोणत्याही सरकारने त्याची दखल घेतली नाही. मात्र हा निष्काळजीपणा अनेकांच्या प्राणांवर बेतू शकतो.

धूलिकण किंवा वालुकाकण मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावरून हवेत बर्‍याच उंचीपर्यंत फेकले जातात तेव्हा अशा आविष्कारांच्या समूहाला धुळीवादळ असे म्हणतात. धुळी वादळांच्या या व्याख्येत धूळ आणि वालुका वादळे, वार्‍याबरोबर मुख्यतः क्षैतिज आणि ऊर्ध्व (उभ्या) दिशेने द्रुतगतीने वाहत जाणारी धूळ, वालुकणांचे द्रुतगती प्रवाह आणि शुष्क धूसर यांचा समावेश होतो. वाळवंट किंवा अन्य ओसाड अर्धशुष्क प्रदेशांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर हे आविष्कार नेहमीच प्रत्ययास येतात.

धूलिकण वालुका कणांपेक्षा आकारमानाने सूक्ष्म असले तरी सामान्यतः धुळीची वादळे आणि वालुका वादळे यांच्यात भेदभाव केला जात नाही. उत्तर अमेरिका, सहारा, इजिप्त, अरेबिया, इराक, इराण, पाकिस्तान, थरचे वाळवंट, उत्तर भारत, चीन, गोबीचे वाळवंट, ऑस्ट्रेलिया आदी प्रदेशांवर ही वादळे निर्माण होतात. अमेरिकेत त्यांना सरसकट धुळीवादळे म्हणतात तर आफ्रिकेत सरसकट वालुका वादळे म्हणतात. आशियात ती निर्माण होतात तेथील भूपृष्ठाप्रमाणे धुळीवादळ किंवा वालुका वादळ म्हणून त्यांना ओळखले जाते. धुळीच्या वादळांमुळे भुसभुशीत जमिनीची फार मोठ्या प्रमाणावर धूप होते आणि अनिष्ट ठिकाणी धुळीचे थर जमा होतात.

मार्च 1901 मध्ये सहारा वाळवंटावर निर्माण झालेल्या वालुका वादळांमुळे 1 लाख 80 हजार टनांपेक्षा अधिक धूळ युरोप खंडावर जाऊन पडली होती आणि तितकीच धूळ भूमध्य सागरात पडली असल्याचा असा अंदाज व्यक्त केला जातो. 1937 मध्ये उत्तर अमेरिकेच्या मध्यवर्ती सखल विभागात आवर्षणाच्या काळात अनेक धुळी वादळे झाल्यामुळे मोठे राष्ट्रीय संकट उभे राहिले होते. त्यामुळे या विभागाला ‘धूलिपात्र’ (डस्ट बाऊल) हे नावच पडून गेले.

धूळ वादळे आरोग्याच्या दृष्टीनेही अपायकारक असतात. या वादळांमुळे अस्वस्थता येते, वातावरणीय दृश्यमानता मंदावते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. धुळीची वादळे विमान वाहतुकीसाठी तर अत्यंत धोक्याची असतात. धुळीचे दाट झोत हवेत फेकले गेल्यामुळे तसेच वातावरणात ते कण दीर्घकाळापर्यंत राहिल्यामुळे विस्तीर्ण भूपृष्ठावर येणार्‍या सौर प्रारणात (तरंगरूपी ऊर्जेत) घट होते. त्याचा हजारो चौरस किलोमीटर क्षेत्रातील हवामानावर परिणाम होऊ शकतो.

दाट धुळी वादळात दृश्यमानता इतकी कमी होते की पाच मीटरपेक्षा दूरच्या अंतरावरच्या वस्तूसुद्धा स्पष्ट दिसत नाहीत. धुळी वादळांची निर्मिती आणि विकास भूपृष्ठाच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. भूपृष्ठावर अगोदरच हिमवृष्टी किंवा पर्जन्यवृष्टी होऊन मृत्तिकेचे कण एकमेकांशी बांधले गेले असतील किंवा जमीन वनस्पतींनी आच्छादलेली असेल तर अशा ठिकाणी धुळीची वादळे निर्माण होऊ शकत नाहीत. पावसाळा आणि हिवाळा संपल्यानंतर विस्तीर्ण क्षेत्रावरील जमीन अर्धशुष्क किंवा कोरडी होते. भूपृष्ठावरील वनस्पतींचे आच्छादनही काहीसे नाहीसे होते.

सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे आर्द्रता निघून जाऊन जमिनीचे वरचे थर चूर्णरूप होतात. ही परिस्थिती धुळीच्या वादळांना अनुकूल असते. हे शास्त्रीय कारण जाणून घेता या वादळांची शक्यता लक्षात घेणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय शोधणे अधिक सोपे होणार आहे. म्हणूनच यादृष्टीने अभ्यासाला गती मिळणे गरजेचे आहे.

प्रा.डॉ.अशोक ढगे

- Advertisment -

ताज्या बातम्या