Wednesday, April 24, 2024
Homeनगरकरोनामुळे यंदा 3 दिवस सामुदायिक विवाह सोहळा - कोते

करोनामुळे यंदा 3 दिवस सामुदायिक विवाह सोहळा – कोते

शिर्डी (प्रतिनिधी) –

साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने अवघ्या सव्वा रुपयात होणारा यंदाचा 19 वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

- Advertisement -

करोना नियमावलीचे पालन करत गर्दी न करता आणि वधु-वरांचे आई-वडील, मामा यांच्या उपस्थीतीत येत्या 13, 14 व 22 मे 2021 या तीन दिवशी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे संयोजक शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी दिली.

साईबाबांच्या शिर्डीच्या भुमीतून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याच्या मुहूर्तमेढ 2000 साली प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांनी रोवली. गेल्या 20 वर्षांत सुमारे 1850 हुन अधिक जोडप्यांना विवाहबध्द करून कन्यादान करण्याचे पवित्र काम कोते दाम्पत्यांनी केले आहे. शिर्डीतील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर संपुर्ण राज्यात विविध सामाजीक संघटनांनी शिर्डीच्या धर्तीवर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून ही चळवळ यशस्वी केली आहे. करोनाच्या काळात गेल्या वर्षी लॉकडॉउनमुळे शिर्डीतील सर्वधर्मीय विवाह सोहळा स्थगित करण्यात आला होता.

सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक कैलासबापू कोते यांनी सांगितले की, करोना पार्श्वभुमीवर यंदाचा शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. वधु-वरांचा विवाह आई-वडील व मामा यांच्या उपस्थितीत लावण्यात येणार असून वधु-वरांच्या अन्य नातेवाईक अथवा मित्रांना या विवाहास उपस्थितीस मज्जाव करण्यात येणार आहे. वधु-वरांना पोशाख, संसारोपयोगी वस्तू आणि वधुंना मंगळसूत्र मोफत देण्यात येणार आहे. तसेच मिष्टान्न जेवनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

साईबाबांच्या नगरीत होणार्‍या या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात सहभागी होणार्‍या इच्छुक वधु वरांची नाव नोंदनी सुरू झाली असुन मुलाचे वय 21 व मुलीचे 18 वर्षे असलेल्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड इत्यादि कागदपत्रांसह एजाज पठाण (7350500091), वाल्मिक बावचे (9823141774), शफीक शेख (9763298712) यांचेशी प्रत्यक्ष भेटून नावनोंदनी करावी, असे आवाहनही संयोजक कैलासबापू कोते यांनी केले आहे.

दिनांक 13 मे रोजी सकाळी 10 वाजता साईप्रसाद अपार्टमेंटच्या प्रांगणात 10 जोडप्यांचा, 14 मे रोजी सकाळी 10 वाजता 10 जोडपे आणि 22 मे रोजी 10 जोडप्यांचा विवाह करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाचा हा सोहळा साध्या पध्दतीने व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या